जिहाद विरोधी तरूणाची व्यथा दाखवल्यामुळे IBN लोकमतवर गुन्हा दाखल

January 29, 2015 4:57 PM1 commentViews:

29 जानेवारी : ठाण्यातील मुंब्रा येथे एका तरुणाने जिहादला नकार दिला म्हणून काही समाजकंटकांनी त्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. पण, ही बातमी दाखवली म्हणून, जमाव भडकावल्याचा आरोप करत मुंब्रा पोलिसांमध्ये IBN लोकमतच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

मुंब्रा येथे जिहादसाठी नकार देणार्‍या एका तरुणाला बेदम मारहाण झाली होती. मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला दोन दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले होते. इतकंच नाही तर मारहाणी नंतर त्या तरुणाच्या घराची आणि गाडीचीही तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी IPC कलम143, 147, 148 आणि 149 अंतर्गत दंगल माजवणे, कलम 354अंतर्गत विनयभंग, कलम 427अंतर्गत तोडफोड करणे, कलम 323अंतर्गत गंभीर मारहाण, कलम 504अंतर्गत शिवीगाळ करणे आणि कलम 506(34) अंतर्गत जीवे मारण्याची धमकी देणे या कलमाखांली गुन्हा नोंदवला आहे. पण, या सर्व प्रकारामुळे हे कुटुंब प्रचंड दहशतीखाली आहे. IBN लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर काही जणांनी पोलिसांकडे IBN लोकमतविरोधातच गुन्हा दाखल केला. त्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतं आहे.

दरम्यान, मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा भागात गुन्हेगारी वाढते आहे. एमडी ड्रग्ज विक्रीचं प्रमाणही वाढलं आहे. ठाणे जिल्ह्यातील काही तरुण ISIS मध्ये सहभागी होण्यासाठी गेल्याचे गेल्यावर्षी उघड झाले होते. आता जिहादसाठी तरुणांची भरती करण्याचं काम सुरू होतं का, असाही संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close