राहुल गांधींवर नाराज, जयंती नटराजन यांनी दिला राजीनामा

January 30, 2015 10:13 AM0 commentsViews:

jayanthi_brking_pallavi2

30 जानेवारी : यूपीए सरकारमधून मागच्या वर्षी केंद्रीय मंत्रिपद काढून घेण्यात आल्यानंतरचा काळ अत्यंत वेदनादायी आणि सार्वजनिक जीवनात अवमानकारक असल्याचं सांगत काँग्रेसच्या माजी खासदार जयंती नटराजन यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.

मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर 3 महिने आधी नटराजन यांना पर्यावरण खात्यात राज्यमंत्री असताना अचानक राजीनामा द्यायला सांगितले होते. त्यानंतर दुर्लक्षित करण्यात आल्यामुळे नटराजन या नाराजन नाराज होते. ‘फिक्की’मध्ये राहुल गांधी यांचे भाषण होण्याच्या एक दिवस आधी नटराजन यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानंतर यूपीए सरकार गुंतवणूकदारांना मैत्रिपूर्ण वातावरण निर्माण करेल असे आश्वासन राहुल गांधी यांनी ‘फिक्की’मध्ये उद्योजकांना दिले होते. राहुल गांधींनी पर्यावरण खात्याच्या निर्णयांमध्येही लुडबूड केल्याचा आरोप नटराजन यांनी केला आहे.

आपल्याला मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास का सांगितले, तसेच पक्षाच्या प्रवक्तेपदावरूनही का हटविण्यात आले असा जाब नटराजन यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात विचारला आहे. तसेच, आपल्याला माध्यमांशी बोलू दिले नाही, असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

राजधानीच्या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता आहे.

सोनिया गांधींना 5 नोव्हेंबर 2014.. म्हणजेच 2 महिन्यांपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलंय..

मॅडम, गेल्या 11 महिन्यांत मला भयानक मनोवेदना झाल्या आहेत. माझ्यावर चुकीचे आरोप करण्यात आले, मला बदनाम करण्यात आले. माझं अख्ख करियर उद्‌ध्वस्त करण्यात आलं. मला एका प्रकारे मृत्युदंड का देण्यात आला, हे मला अजूनही समजू शकलं नाहीये.
20 डिसेंबर 2013 रोजी मला अचानक पर्यावरण मंत्रिपदाचा राजीनामा का द्यायला लावला, हे मला कळलं नाहीये.
मला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितलं की काँग्रेसच्या अध्यक्षांनी मला पक्षकार्यासाठी बोलवलं आहे. मी राजीनामा दिल्यानंतर मात्र मला समजलं की राहुल गांधींच्या ऑफिसमधून पत्रकारांना सांगितलं जात होतं की माझा राजीनामा पक्षकार्यासाठी नाहीये.
नंतर राहुल गांधींनी फिक्कीच्या कार्यक्रमात बोलताना उद्योगपतींना सांगितलं की पर्यावरण खात्याने परवानगी वेळेत न दिल्यामुळे आर्थिक प्रगतीवर वाईट परिणाम झालाय. माझं काय चुकलं, असं विचारणारा मेसेज मी राहुल गांधींना पाठवला. त्यावर त्यांनी, ‘मी सध्या बिझी आहे, नंतर भेटू’, असं उत्तर दिलं. अनेक वेळा विनंती करूनही आजपर्यंत त्यांनी मला वेळ दिली नाहीये. खरं तर, राहुल गांधींच्या ऑफिसमधून मला पर्यावरणविषयक अनेक विनंती यायच्या आणि मी त्यांचा आदर राखत निर्णय घ्यायचे. माझं जर काही चुकलं असेल, तर स्पष्टीकरण देण्याचीही संधी का देण्यात आली नाही?

- जयंती नटराजन

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close