मनसेत आता आचारसंहिता !

January 30, 2015 11:08 PM0 commentsViews:

raj_nashik43530 जानेवारी : नेहमी ‘खळ्ळ खट्याक’ची भाषा वापरणारी मनसे आता आचारसंहिता ‘स्टाईल’ आजमावून पाहत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांसाठी पक्षात आचारसंहिता लागू केलीये. तसंच प्रत्येक निवडणूक काही शिकवून जाते, पराभवामुळे आम्ही हार मानत नाही. कार्यकर्त्यांनी आता आणखी जोमानं कामाला लागावं असे आदेश राज यांनी दिले. मुंबईत आज (शुक्रवारी) मनसेचा मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते.

लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही मनसेचं इंजिन रुळावरून घसरलं. दोन्ही निवडणुकीत मनसेला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. पण तरीही पराभवाने खचलेल्या मनसेची डोकेदुखी मात्र काही पिच्छा सोडायला तयार नव्हती. मुंबई, नाशिक, पुणे, धुळे इथं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट राजीनामासत्रच सुरू केलं होतं. नाशिकमध्ये मनसेचे नेते वसंत गीते यांच्यासह दीडशे जणांनी मनसेला रामराम ठोकला. त्यांच्यापाठोपाठ माजी आमदार प्रवीण दरेकरही भाजपच्या तंबूत दाखल झाले. वरिष्ठ नेते, पदाधिकारी राजीनामा देत असताना राज यांनी सर्वांचे राजीनामा स्वीकारले, ‘कोण सोबत आहे कोण नाही हे तरी कळलं’ अशी भावनिक प्रतिक्रिया दिली. पण तरीही मनसेला घरघर सुरूच होती. आज मुंबईत मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी राज यांनी मरगळलेल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. “मी आजपर्यंत कधीही कोणत्याही निवडणुकीत जय-पराजय याचा विचार केला नाही. प्रत्येक निवडणूक ही काही शिकवून गेली. पराभव असो की विजय याचा मी धडा म्हणूनच घेतो. हीच गोष्ट आज सर्व कार्यकर्त्यांना समजून सांगितली” असं राज यांनी सांगितलं. तसंच यापुढे पक्षात आचारसंहिता लागू करण्यात आलीये. पक्ष वाढवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी टेली काँन्फरन्स घेतली जाईल असंही राज म्हणाले. पक्षातून कोण सोडून गेलंय याबद्दल मला काही बोलायचं नाही. आम्ही काय करायचं याबद्दल मी, आणि माझ्या पक्ष पाहून घेईन मीडियाने याची चिंता करू नये अशी प्रतिक्रियाच राज यांनी दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close