पराभवाच्या भीतीनेच किरण बेदींना बनवलं मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार – संघ

February 3, 2015 1:52 PM0 commentsViews:

303967-bediदिल्ली (03  फेब्रुवारी):  दिल्लीत भाजपसाठी जनमत फारसे अनुकूल दिसत नसल्याने, पराभवाच्या भीतीनेच किरण बेदींना ‘मुख्यमंत्री’पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केल्याची कबुली ‘ऑर्गनायझर’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात देण्यात आली आहे. तसेच यंदाची दिल्ली निवडणूक सोपी नाही, असा धोक्याचा इशाराही या लेखातून भाजपाला देण्यात आला आहे.

किरण बेदींची भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी व्यक्त झाली होती. पण पक्ष नेतृत्वाला त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुरुवातीच्या गोंधळानंतर आता कुठे भाजपचा प्रचार योग्य मार्गाने सुरू झाला आहे. बेदींना भाजपमध्ये आणणे एक सकारात्मक पाऊल आहे, असे या लेखात म्हणण्यात आले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी 49 दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने दिल्लीकरांमध्ये ‘आप’विरोधात नक्कीच लाट होती. पण तरीही दिल्लीत भाजपची स्थितीही फारशी चांगली नव्हती. ‘आप’ने सत्ता सोडल्याने दिल्लीकरांना आपली फसवणूक झाल्याचे वाटत होते. पण भाजपबाबतही फारशी चांगली मते नसल्याचा फिडबॅक भाजप नेतृत्वाला मिळाला. त्यामुळे अखेरीस किरण बेदींना आणण्याचा निर्णय घेतल्याचे लेखात म्हटले आहे.

तसेच भाजप नेत्यांकडून होणार्‍या नकारात्मक टीकेबाबातही लेखातून समज देण्यात आली आहे. ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे सोशल नेटवर्किंग साईट्स आणि सोशल मीडियाचा वापर अत्यंत योग्य पद्धतीने केला पण भाजप नेत्यांनी मात्र ट्वीटर आणि फेसबूकवर नकारात्मक कमेंटस् कमी केल्या पाहिजेत’, असा सल्लाही देण्यात आला आहे.

त्याचबरोबर, अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या भारत दौर्‍यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा होणार असल्याचंही या लेखात म्हटलं आहे. दिल्लीतील नागरिक अजूनही मोदींच्या मॅजिकची वाट पाहत असले तरी, ओबामांच्या तीन दिवसीय दौर्‍यात भारत आणि अमेरिकेतील व्यावसायिक नाते अधिक दृढ झाल्याने भाजपला त्याचा फायदा मिळेल असे म्हटले जात आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close