रिव्ह्यु : लक्षात राहिल असा ‘शमिताभ’ !

February 7, 2015 3:48 PM0 commentsViews:

अमोल परचुरे, समीक्षक

‘ये पिक्चर नहीं, मिक्श्चर है…’अमिताभच्या तोंडी असलेला हा डायलॉग सिनेमालासुद्धा सूट होणारा आहे. धनुष आणि अमिताभ बच्चन यांचं मिक्श्चर… भरदार आवाज आणि लवचिक अभिनयाचं मिक्श्चर..आर.बाल्की या दिग्दर्शकानं सॉलीड डोकं चालवून हे मिक्श्चर तयार केलंय. धनुष आणि अमिताभ बच्चन यांना एकत्र आणलं आणि त्यांच्याच नावातून तयार केलं ‘शमिताभ’ हे नाव. बाल्कीने एक धाडस तर केलंय, वेगळा प्रयोग केलाय, पण हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाहीये. इंटरव्हलपर्यंतचा सिनेमा बघताना आपण भारावून जातो, इंटरव्हलनंतर थोडी चुळबूळ सुरू होते आणि क्लायमॅक्सला तर निराशा पदरी येते. असं जरी असलं तरी शमिताभला टाळून चालणार नाही.

काय आहे स्टोरी ?

sham11-jan7ही गोष्ट आहे इगतपुरीमधल्या दानिशची…जन्मापासून मुका असलेला हा दानिश सिनेमांचा प्रचंड चाहता आहे. सिनेमा म्हणजे त्याचा जीव की प्राण आहे. आपण मोठं झाल्यावर ऍक्टर बनायचं हे त्याने लहानपणीच पक्कं ठरवलंय. मुंबईत आल्यावर त्याचा स्ट्रगल सुरू होतो. दिसायला अगदीच साधारण आणि त्यात मुका…पण त्याची दया येते अक्षरा या असिस्टंट डायरेक्टरला.

sham5-jan7ती दानिशला मदत करते, मग एक वैद्यकीय चमत्कार होतो आणि दानिशला उसना आवाज मिळतो अमिताभ सिन्हा या दारुत बुडालेल्या माणसाचा…मग पुढे दानिश आणि अमिताभ सिन्हा यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू होते म्हणजे नेमकं काय काय घडतं ते सिनेमातच बघायला मजा येईल.  अतिशय ब्रिलियंट स्टोरी आहे, फक्त ती शेवटाकडे नेताना थोडी गडबड झालेली आहे.

कलाकार, त्याची कला, कलाकाराचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, यशस्वी झाल्यानंतरही न संपणारा संघर्ष असं बरंच या कथेत येतं. त्यातून बाल्कीला बॉलीवूडची मानसिकता प्रेक्षकांसमोर ठेवायचीये आणि त्यासाठी त्याने बॉलीवूड या शब्दावर नाराजी प्रकट करणारा महानायक अमिताभ बच्चन आणि बॉलीवूडमध्ये स्थिरावू पाहणारा पण दक्षिणेत प्रचंड लोकप्रिय असणारा धनुष यांची निवड केलीये. ही निवड खरंच खूप योग्य आहे, याशिवाय वेगळं कास्टिंग होऊच शकलं नसतं असंच सिनेमा बघून वाटतं.

परफॉर्मन्स

अक्षरा हसन हे शमिताभचं मोठं सरप्राईझ पॅकेज आहे. आई सारिकाचा गोड चेहरा आणि कमल हसनची कमाल ऍक्टिंग याचं उत्तम मिक्श्चर म्हणजे अक्षरा हसन. अमिताभ बच्चन आणि धनुष या दोघांसमोर तिने अगदी तोडीस तोड अभिनय केलाय. धनुष हा खरंच आश्चर्यकारक अभिनेता आहे. देखणा चेहरा नाही, सिक्स पॅक वगैरे बॉडी नाही. तरीही केवळ एक्स्प्रेशनवर प्रेक्षकांना बांधून ठेवतो. sham12-jan7शमिताभमध्ये मुका असूनही तो डोळ्यातून बोलतो, हातवार्‍यांमधून व्यक्त होतो, सिनेमात धनुष आणि अमिताभ यांच्या अभिनयाची जुगलबंदी नसली तरी तो महानायकासमोर ताकदीने उभा राहतो. सर्वात कमाल आहे ती अमिताभची…अँग्री यंग मॅनच्या काळापासून इंडस्ट्रीमध्ये अढळ स्थानावर असलेल्या बिग बीसाठी हा खूपच महत्त्वाचा रोल आहे. सतत दारुच्या नशेत असलेला अमिताभ सिन्हा हा मोजकं बोलतो, पण बोलतो तेव्हा भारदस्त बोलतो, जीवनाचं तत्त्वज्ञान सांगताना तोसुद्धा इगोमध्ये गुरफटतो. त्याची ईर्षा, त्यला येणारं नैराश्य, त्याचा मिश्कीलपणा असे सगळे प्रकार खास अमिताभ स्टाईलमध्ये पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. इंटरव्हलनंतर थोडा पेशन्स ठेवलात तर शमिताभ-एक खास अनुभव म्हणून नक्कीच लक्षात राहील.

रेटिंग 100 पैकी 75

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close