रोहतकमध्ये निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती

February 8, 2015 4:57 PM0 commentsViews:

molestation

08 फेब्रुवारी : हरियाणातील रोहतक इथे एका गतिमंद तरुणीवर पाशवी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

संपूर्ण देशाला हादरवून टाकणार्‍या निर्भया प्रकरणाप्रमाणेच या प्रकरणातही अज्ञात नराधमांनी 28 वर्षाच्या मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचं स्पष्ट झाले आहे. एवढचं नाही तर बलात्कारानंतर या नराधमांनी पीडितेच्या गुप्तांगामध्ये दगड आणि काही काचेचे तुकडेही टाकल्याचे समोर आलं आहे. पीडित तरुणी मूळची नेपाळची राहणारी होती. मानसिक आजार असल्यामुळे उपचारांसाठी आपल्या बहिणीकडे रोहतकला आली होती. काही दिवसांपूर्वा ती बेपत्ता असल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलीस तक्रारही नोंदवली होती. मात्र, 4 फेब्रुवारीला रोहतकजवळील एका गावातल्या निर्जन ठिकाणी एक निर्वस्त्र मृतदेह आढळून आला. मृतदेह अतिशय वाईट अवस्थेत होता आणि त्याचा बराचसा भाग वन्यप्राण्यांनीही खाल्ला असल्याचं उघड झालं.

हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी पोस्टमोर्टमसाठी पंडित भगवत दयाल शर्मा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सकडे पाठवला. या रिपोर्टमध्ये या नराधमांनी पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यापूर्वी तिच्या गुप्तांगात काठी, छोटी खडी टाकण्याचे अत्यंत निर्घृण कृत्य केल्याचेही उघडकीस आले. तिला जबर मारहाण झाल्याची अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यावर पोलिसांनी अज्ञात नराधमांविरोधात बलात्कार, हत्या, अनैसर्गिक संभोग अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. नराधमांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकं तयार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करुन
पीडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे देशभरात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली असून, महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close