लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते, सेनेकडून भाजपच्या जखमेवर मीठ !

February 10, 2015 4:58 PM0 commentsViews:

uddhav on modi4410 फेब्रुवारी : दिल्लीतील जनतेचं कौतुक करावं तेवढं थोडं कमी आहे. कितीही दबाव आला असेल, प्रचाराची रणधुमाळी उडाली असेल पण दिल्लीकरांनी लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते हे दाखवून दिलं अशा शेलक्या शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करून भाजपच्या जखमेवर मीठ चोळलंय. तसंच जनतेला गृहित धरू नये, आजचा निकाल हा सर्व राजकारण्यांसाठी धडा आहे असंही उद्धव म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झालाय. तर आम आदमी पार्टीने ऐतिहासिक विजयाची नोंद केलीये. यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अरविंद केजरीवाल यांचं कौतुक केलंय. उद्धव यांनी केजरीवाल यांना फोन करून विजयाबद्दल अभिनंदन केलंय. त्यानंतर त्यांनी मित्रपक्ष भाजपवर नाव न घेता हल्लाबोल केला. देशातली जनता अस्वस्थ आहे म्हणून दिल्लीत लोकसभेपेक्षा उलटा निकाल दिला आहे. मुळात जनतेला कोणत्याही पक्षाने गृहित धरू नये, हा निकाल एका प्रकारे राजकारण्यांसाठी धडा आहे. या निकालाबद्दल दिल्लीकरांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण, दिल्लीकरांवर दबाव टाकण्यात आला. आमिष देण्यात आली पण त्याला न जुमानता लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते हे त्यांनी दाखवून दिलं अशी टीका उद्धव यांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता केली. तसंच या निकालाचा अर्थ ज्याला हवा त्यांनी तसा घ्यावा असा टोलाहीही लगावला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close