शिवसेना-भाजपमधील धुसफूस वाढता वाढे !

February 11, 2015 10:34 PM0 commentsViews:

bejp_meet_uddhav_thacakrey11 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. भाजपच्या या जखमेवर शिवसेनेनं मीठ चोळण्याची संधी काही सोडली नाही. भाजपनेही जशाच तसे उत्तर देत सत्तेतून बाहेर पडा अशी धमकीच दिली. तर सेनेनंही राज्यमंत्र्यांना अधिकार दिले जात नाही असा सूर लगावत सेनेच्या मंत्र्यांनी राजीनामास्त्र उपसले. दिल्लीच्या निकालानिमित्ताने भाजपचा दिल्लीत ‘गोंधळ’ उडालाय तर राज्यात राडा सुरू झालाय.

‘लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते’ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची टीका भाजपच्या नेत्यांना चांगलीच जिव्हारी लागलीये. एकतर दिल्लीचं तख्त राखण्यात अपयश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पराभवाचं खापर फुटत असल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी जशास तसे उत्तर दिले. मोदींवर टीका खपवून घेणार नाही, टीका करायची असेल सत्तेतून बाहेर पडा असा थेट इशाराच आशिष शेलार यांनी दिला. आरोप-प्रत्यारोपाच्या नाट्यानंतरही शिवसेना भाजपमध्ये सुरू झालेला बेबनाव कमी होताना दिसत नाहीय. राज्यमंत्र्यांना अधिकार नाहीत, मग मंत्रीपद कशाला असं विचारून शिवसेनेचे संजय राठोड यांनी राजीनाम्याची तयारी दाखवल्यामुळे एकच खळबळ उडाली. यालाच राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि दादा भुसे या राज्यमंत्र्यांनी दुजोरा दिलाय. कागदोपत्री काय अधिकार आहेत, हे मुख्यमंत्र्यांना माहितीये. आम्ही आमचं गार्‍हाणं मांडलंय, असं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. मोदींवर टीका करायची असेल तर सत्तेतून बाहेर पडा असं आव्हान भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काल केलं होत. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांनी अधिकार नसतील तर राजीनामा देतो असा मुद्दा पुढे करत पुन्हा भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.

‘आशिष शेलार अधिकृत व्यक्ती नाहीत’

दुसरीकडे, नरेंद्र मोदींवर टीका करायची असेल तर सत्तेतून बाहेर पडा, या आशिष शेलार यांच्या वक्तव्याचे शिवसेनेत तीव्र पडसाद उमटले. युतीबाबत निर्णय घेण्यासाठी आशिष शेलार हे अधिकृत व्यक्ती नाहीत असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लगावला. तर मस्ती केली तर जनता मस्ती उतरवते हा दिल्लीचा धडा आहे, अशा शब्दांमध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भाजपला फटकारलं.

केसरकरांची सारवासारव

दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये वाद नाहीत, असं म्हणत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मंत्री आणि राज्यमंत्र्यांमधल्या अधिकारांच्या वाटपासाठी आघाडी सरकारला 2 वर्षं लागली. आम्हाला तर फक्त 100 दिवस झालेत, असं केसरकर यांनी म्हटलंय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून आपल्याला चांगलं सहकार्य मिळत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close