अखेर शिवस्मारकाला अंतिम मान्यता, मात्र 19 ला भूमिपूजन नाही

February 13, 2015 7:01 PM0 commentsViews:

shivsamarak13 फेब्रुवारी : अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अखेर आज (शुक्रवारी) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं परवानगी दिली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयबीएन लोकमतला दिली. लवकरच स्मारकाच्या कामाचं टेंडर काढलं जाणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. परंतु, 19 तारखेच्या नंतर स्मारकाच्या भूमिपूजनाचा निर्णय घेतला जाणार आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न आघाडी सरकारच्या काळात मार्गी लागला. आणि फडणवीस सरकारने त्यावर शिक्कामोर्तब करून स्मारकाचा मार्ग मोकळा करून दिला. नियोजित शिवस्मारकाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 4 डिसेंबर रोजी हिरवा कंदील दिला होता. त्यामुळे शिवजयंतीला म्हणजेच 19 फेब्रुवारीला मुंबईतील अरबी समुद्रात नियोजित छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात येणार येईल अशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण स्मारकासाठी आणखी काही परवानग्या बाकी असल्यामुळे भूमिपूजनाची तारखी पुढे ढकलण्यात आलीये. अखेर संध्याकाळी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्मारकाला परवानगी दिली अशी माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी आयबीएन लोकमतला दिली. स्मारकाच्या कामाचं टेंडरही लवकरच काढलं जाणार आहे. पण, शिवजयंतीला अर्थात 19 फेब्रुवारीला स्मारकाच्या भूमिपूजनाचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे 19 तारखेला भूमिपूजन होऊ शकणार नाही हे आता निश्चित झालंय. विशेष म्हणजे शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते. पण स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त जरी लांबला असला तरी महत्वाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून लवकरच स्मारकाच्या कामाला सुरूवात होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close