शरद पवार हे शेतकर्‍यांचा विचार करणारे नेते -पंतप्रधान

February 14, 2015 3:54 PM1 commentViews:

pm at baramatiबारामती (14 फेब्रुवारी) : “मला शरद पवारांचे अनुभव घ्यायला हवेत, त्यांचे विचार घ्यायला हवेत, कारण ते खूप अनुभवी राजकारणी आहेत, शरद पवार हे शेतकर्‍यांच्या विचार करणारे नेते आहेत” हे बोल आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. राजकारणाच्या आखाड्यात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे शरद पवार आणि नरेंद्र मोदी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी एकाच व्यासपीठावर आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळलीच पण पवारांनी राज्यातील समस्यांचा पाढाच पंतप्रधानासमोर वाचला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या बारामतीत येणार…या बातमीने देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. अखेर आज तो दिवस उजाडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी नऊ वाजता दिल्लीहुन बारामतीला रवाना झाले. पुण्यात चाकणला कार्यक्रम आटोपून पंतप्रधान 11 वाजता बारामतीत दाखल झाले. बारामतीत विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाची पाहणी करून याच संकुलात उभारलेल्या सीबीएसई माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचे उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडलं. तेथून भिगवण येथील शारदानगर शैक्षणिक संकुलातील अप्पासाहेब सभागृहाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं. यावेळी दोन्ही नेत्यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केलं.

मोदींनी उधळली पवारांवर स्तुतीसुमनं

नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची मराठीतून सुरूवात करून उपस्थितांची मनं जिंकली. त्यानंतर त्यांनी पवारांवर स्तुतीसुमनं उधळली. आज मी तुमची काम करण्यासाठी बारामती आलोय. आम्ही राजकारणात आहोत पण आमच्यासाठी राष्ट्रनीती महत्वाची असते. पण, आम्ही वेगळ्या पक्षाचे लोक एकत्र आलो की, का मोठ्‌या बातम्या बनतात हेच मला कळत नाही ?, मला शरद पवारांचे अनुभव घ्यायला हवेत. त्यांचे विचार घ्यायला हवेत कारण ते खूप अनुभवी राजकारणी आहेत. त्यांचे महत्व जास्त आहे. गुजरातमध्ये मला काही अडचणी आल्या तर मी शरद पवार यांचे विचार घ्यायचो. एवढंच नाहीतर त्यांना गुजरात मध्येही बोलावलं होतं. बारामतीच्या शेतकर्‍यांमध्ये मती आहे आणि गती आहे, जिथे मती आणि गती असते तिथे प्रगती असते. शरद पवार हे शेतकर्‍यांसाठी नेहमीच विचार करणारे नेते आहेत अशी स्तुतीसुमनं मोदींनी उधळली.

तसंच शरद पवार आणि माझं महिन्यातून दोन ते तीन वेळा बोलणं होतं असा खुलासाही मोदींनी केला. आज कृषीक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची अत्यावश्यक गरज आहे. कृषी विज्ञान केंद्राद्वारे आपण शेतकर्‍यांमध्ये विश्वास जागवू शकतो असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. तसंच गेल्या 10 वर्षांत जी कामं अपुरी राहिले आहे. ती काम मला करावी लागणार आहेत असंही मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी मीडियालाही खडेबोल सुनावले. आज मीडियासाठी विशेष दिवस आहे, मोदी पहिले काय बोलले होते आणि आता काय बोलले हेच जास्त दाखवलं जातं. पण लोकशाहीची हीच खासियत आहे आणि ती त्याची ब्युटी आहे. लोकशाहीत विवाद आणि संवाद या दोघांवर चालतो असं मतंही त्यांनी मांडलं.

पवारांनी केली धनगर समाजाला आरक्षणाची मागणी

नरेंद्र मोदींनी बारामतीतला आल्याबद्दल शरद पवारांनी आभार मानले. आपल्या भाषणात शरद पवारांनी दुष्काळ, शेती, आरक्षणाच्या मुद्यावर भर दिला. धनगर समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं असून यामध्ये पंतप्रधानांनी लक्ष घालावं. धनगरांना आरक्षण मिळायला हवं अशी मागणी शरद पवारांनी केली. तसंच आज राज्यात दुष्काळाची परिस्थितीत दिवसेंदिवस भंयकर होत चाललीये. मुख्यमंत्री, राज्य सरकार दुष्काळ निवारणासाठी, शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी प्रयत्न करतायत. पण दुष्काळी भागातील जनतेला न्याय मिळवून देणं गरजेचं आहे असं मतंही पवारांनी व्यक्त केलं. तसंच शेती क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे.ऊस उत्पादक शेतकर्‍यांची स्थिती अतिशय वाईट आहे. शेती ,पशुधन वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे साखर कारखाने अडचणीत आहे. त्यामुळे शेतकरी आणि साखर कारखानदारांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेणे गरजेचे आहे असा सल्लाही पवारांनी दिला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Aditya

    Election purvi Natural Corrupt Party hoti ata kaye zahala????

close