मांझींनी समर्थन देणं म्हणजे काळ्या पर्वाची बाजू घेणं- शिवसेना

February 16, 2015 12:46 PM0 commentsViews:

uddhav_on_ncp

16 फेब्रुवारी :  बिहारमधील सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून शिवसेनेने आज (सोमवारी) पुन्हा एकदा आपला मित्रपक्ष भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना नितीशकुमार यांच्या विरोधात खेळवत आहे, असा आरोप शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तल्या अग्रलेखामधून करण्यात आला आहे. मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी समर्थन देणं म्हणजे राजकारणातील काळ्या पर्वाची बाजू घेणे, अशीही टीका करण्यात आली आहे.

एका राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला कमिशन मिळत असल्याची कबुली देतात आणि तेच कमिशनबाज मुख्यमंत्री बिहारच्या विधानसभेत भाजपच्या पाठिंब्यावर बहुमत जिंकण्याची तयारी करत आहेत. मांझी यांच्या डोक्यात इतकी हवा गेली की, त्यांनी अनेकदा भ्रष्टाचाराचे खुले समर्थन केले. हे त्यांच्या अज्ञानातून झाले असे म्हटले तरी त्याची किंमत राज्याला चुकवावी लागते. मांझी यांनी राजीनामा देण्याचा पक्षादेश जुमानला नाही. 130 आमदारांचे पाठबळ नितीशकुमारांच्या पाठीशी असतानाही ‘भाजप’च्या पाठिंब्यावर बहुमत जिंकण्याची धडपड ते करत असल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.

भाजप मांझी यांना नितीशकुमार यांच्या विरोधात खेळवत आहे व हा खेळ विधानसभेत बहुमताच्या वेळी संपेल, पण ‘मांझी’ यांना समर्थन देणे म्हणजे राजकारणातील काळ्या पर्वाची बाजू घेणे होय. कमिशनखोरीचे समर्थन करण्यासारखे हे पाप राजकीय स्वार्थासाठी कोणी करू नये, असा सल्लाही यात देण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close