युतीच्या जागा वाटपात गुहाघरचा तिढा

September 15, 2009 2:08 PM0 commentsViews: 2

15 सप्टेंबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीतली बिघाडी अजून संपत नाही. तर दुसरीकडे युतीचाही तिढा सुटलेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सध्या कोणी किती जागा लढवायच्या यावरून रस्सीखेच सुरू आहे. पण युतीच्या जागावाटपात कोण किती जागा लढवणार याच गणितं सुटलं आहे. शिवसेना 171 तर भाजप 117 जागा लढवणार हे स्पष्ट झालं आहे. घोडं अडलंय ते गुहाघरच्या जागेवरून. भाजप गुहाघर सोडायला तयार नाही. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुहाघर मतदारसंघाबाबत शिवसेनेने भाजपवर हवा तसा दबाव टाकला नाही म्हणून रामदास कदम नाराज आहेत. जर योग्य दबाव टाकला असता तर जागा शिवसेनेला सुटली असती, असं कदमांचे समर्थक बोलतायत. ' तर गुहागरसाठी शिवसेना प्रयत्न करतेय. अजूनही प्रयत्न सुरू आहेत. राहिला प्रश्न कदमांच्या नाराजीचा तर मला असं वाटत नाही की कदम नाराज आहेत. कारण ते एक निष्ठावंत शिवसैनिक आहेत ' , असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. शिवसेनेतून असं मधाचं बोट लावलं जात असताना, भाजपचे नेते तर जागावाटपाबद्दल काहीच बोलत नाहीत. गुहाघरचा विषय जरी काढला तरी सावध होतात. नितीन गडकरी यांना गुहागरच्या जागेबाबत विचारलं असता, ' जागावाटप लवकरच जाहीर करू, आता मी त्यावर बोलणं योग्य होणार नाही. युतीच्या जागावाटपाची चर्चा संपलेली आहे. येत्या एक दोन दिवसात जागावाटप जाहीर होईल' . असं म्हणतात. पण रामदास कदमांचं काय झालं त्यावर मात्र दोन्हीकडचे नेते मूग गिळून गप्प आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जागावाटप जाहीर करताना पहिल्यांदा ज्या जागांवर वाद नाहीत, त्या जागा पहिल्या घोषित केल्या जातील. मग मतदारसंघ फेररचनेमुळे अदलाबदल झालेल्या जागा जाहीर केल्या जातील. आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी जिथे बंडखोरी होऊ शकते अशा जागा जाहीर करण्यात येतील. डच्चू मिळणार असलेल्या ज्येष्ठांनाही समजावण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पण असं असलं तरी रामदास कदमांबाबत अजून काहीच स्पष्ट झालेलं नाही. आणि त्याबद्दल बोलायला कोणीच तयारही नाही.

close