महाराष्ट्राचे ‘आबा’ गेले, आर.आर.पाटील यांचं निधन

February 16, 2015 5:09 PM1 commentViews:

RR PATIL16 फेब्रुवारी : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांचं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. आर.आर.पाटील गेल्या काही दिवसांपासून तोंडाच्या कॅन्सरमुळे त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गेल्या तीन महिन्यांपासून आबांनी कर्करोगाशी झुंज दिली मात्र,आज त्यांची झुंज अपयशी ठरली. आज दुपारी उपचारादरम्यान आबांनी अखेरचा श्वास घेतला. आबांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे ‘आबा’ हरपले अशी भावना व्यक्त होतं आहे. उद्या दुपारी 12 वाजता सांगलीत त्यांच्या जन्मभूमी तासगाव इथं अंत्यसंस्कार होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी दिली. आर. आर पाटलांच्या अकाली निधनामुळे उभा महाराष्ट्र हळहळलाय.

“बडे बडे देशोमे छोटे छोटे हादसे होतेही रहते हे…”आबा, तुमचा हा डायलॉग खरंतर खूप वेगळ्‌या कारणांसाठी गाजला…त्याचे दुष्पपरिणामही तुम्ही मंत्रिपद गमावून भोगले. पण तुमची ही अकाली एक्झिट नक्कीच छोटी घटना नाही. तुमचं हे अर्ध्यावरून डाव मोडून जाणं फक्त मनालाच चटका लावून गेलं नाही, तर उभा महाराष्ट्र हळहळलाय. त्यातही सगळ्यांत जास्त नुकसान झालं असेल तर ते पवारांच्या राष्ट्रवादीचं. कारण तुम्ही राष्ट्रवादीचा स्वच्छ, सोज्ज्वळ चेहरा होतात..

आर. आर. पाटील हे सर्वार्थाने ‘अंजनी’चे सूत होते….गरीब शेतकर्‍याच्या घरात जन्मलेल्या रावसाहेब रामराव पाटील यांनी शालेय दशेतच वक्तृत्वस्पर्धा गाजवायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये आल्यावर हे वक्तृत्वच त्यांच्या चरिर्थाचं साधन बनलं. आपला मुद्दा ठासून मांडण्याचे कसब असलेले आबा.. निवडणुकीदरम्यान, नेत्यांसाठी चक्क भाषणं ठोकत फिरायचे… सांगलीकरही आबांची भाषणबाजी डोक्यावर घ्यायचे…याच काळात आबांंना राजकारणाची गोडी लागली. आपल्या भाषणांंच्या जोरावर उमेदवार निवडून येत असेल तर मग आपण का निवडणूक लढवू नये, असा प्रश्न आबांना पडला नसता तरच नवल…मग काय आबांनीही वकिलीचे शिक्षण घेत असतानाच राजकारणाच्या आखाड्‌यात उडी घेतलीे. याच काळात आबा त्यांच्या खुमासदार भाषणांमुळे शरद पवारांच्या नजरेत भरले.

दस्तुरखुद्द पवारांचीच साथ मिळाल्याने आबांनीही तिथून पुढे…कधी मागे वळून पाहिलं नाही. पण राजकारणात पुढे जाऊनही आबा तासगावकरांना कधीच विसरले नाहीत. अगदी आबा मंत्रिपदी असतानाही त्यांच्या मुली जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकत होत्या. झेडपी सदस्य ते राज्याचा उपमुख्यमंत्री हा टप्पा आबांनी मोठ्या झपाट्याने पार केला. आणि प्रत्येक पायरीवर आपल्या कामाचा ठसा उमटवला. आता ग्रामविकास खात्याचच घ्या ना. आधी हे खातं फारसं चर्चेतही नसायचं.

पण आबांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवून खात्याला एक आगळी वेगळी ओळख निर्माण करून…पुढे गृहखात्यात बढती मिळाल्यानंतरही त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्त योजना राबवून उभ्या महाराष्ट्रातले हजारो तंटे चुटकीसरशी मिटवले. नक्षलग्रस्त गडचिरोलीचंही पालकत्व स्वीकारून आदिवासींच्या नेमक्या समस्या जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. एवढंच नाही, तर आदिवासी मुलांना दत्तक घेऊन इंग्रजी शाळेत घातलं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. गृहमंत्री असताना सावकारांच्या विरोधातली ‘ती कोपरापासून ढोपरापर्यंत सोलूनट काढायची प्रतिज्ञा राज्यातला गरीब शेतकरी कधीच विसरू शकणार नाही.

तसंच डान्सबार बंदीवरचा आबांचा निर्णय धाडसी आणि वादग्रस्त ठरला, पण यामुळे नक्कीच हजारो संसार उद्धवस्त होण्यापासून वाचले असतील.

आबा हे धडाडीचे निर्णय घेऊ शकले कारण, त्यांच्या पाठीशी शरद पवार भक्कमपणे उभे राहिले. अगदी सुरुवातीपासून सर्व विरोध डावलून पवारांनी आबांच्या पाठीवर हात ठेवला. युती सरकारच्या काळात पवारांनी आर आर पाटलांना पक्षाचा मुख्य प्रतोद केल्यानंतर काँग्रेसमध्ये अनेकांच्या भुवय्या उंचावल्या होत्या. पण आबांनी युतीच्या मंत्र्यांचे विधानसभेत वाभाढे काढून पवारांचा विश्वास सार्थ करून दाखवला. म्हणूनच पवारांनी इतर सुभेदारांना बाजूला सारून आर आर पाटलांना थेट उपमुख्यमंत्रिपदी बसवलं.

नव्हे, राज्यात राष्ट्रवादीचा चेहरा बनवलं. आर. आर. पाटलांनीही मीडियाचा खुबीने वापर करून आपल्या स्वच्छ प्रतिमेचा राष्ट्रवादीला मोठा फायदा करून दिला. म्हणूनच इलेक्शन आलं की, शरद पवार आर. आर. आबांना प्रदेशाध्यक्ष बनवून राज्यभर प्रचारासाठी फिरवायचे. राष्ट्रवादीची मुलूख मैदान तोफ होते आबा. पण आता हीच तोफ कायमची थंडावलीय. राजकारणी असूनही त्यांनी त्यांच्यातला माणूस कधीच मरू दिला नाही. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडेंपाठोपाठ महाराष्ट्राने आणखी एक जनसामान्यांचा नेता गमावलाय. महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला आयबीएन लोकमत परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • mansainik

    DHUKHAD BATAMI AHE KHUP……………
    AABA AMAR RAHE…………….

close