आबा आपल्यात नाही हे पचवणं अशक्य -शरद पवार

February 16, 2015 9:01 PM1 commentViews:

pawar and r r patil16 फेब्रुवारी : आर.आर.पाटील हा अत्यंत साधा माणूस होता, आर.आर नाहीत हे पचवणं अशक्य आहे अशी भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या या धडाडीच्या सहकार्याबद्दल व्यक्त केली. आर.आर. यांनी अनेक संकटं पचवली. त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मला यशवंतरावांनी घडवलं आणि आबांच्या नेतृत्वाला माझी साथ मिळाली. आबा आपल्यात नाहीत हे पचवणं कठीण आहे असंही पवार म्हणाले. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचं आज मुंबईतील लीलावती रूग्णालयात निधन झालं. आबांच्या या अकाली एक्झिटमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होतेय.

आर आर पाटील यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादीवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. राष्ट्रवादीचा आधार हरपला असं सांगताना छगन भुजबळ यांना अश्रू अनावर झाले. आबांनी आपल्या कारकीर्दीत अनेक धाडसी निर्णय घेतले.आणि त्यांच्या निर्णयासाठी शरद पवार खंबीरपणे पाठीशी उभे होते.

शरद पवार आपल्या या सहकार्‍याबद्दल म्हणतात, “आर. आर. पाटील यांचं निधन व्यक्तिश: मला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला धक्का देणारी गोष्ट आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून जिल्हा परिषद, पंचायत समिती ते विधानसभेतील प्रभावी नेते, गृहमंत्री, ग्रामविकासमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सगळ्या पदांवर काम करताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवली. सामाजिक जीवनामध्ये कसं राहावं, कसं काम करावं याचा आदर्शच त्यांनी घालून दिला. अत्यंत साधी राहणी, उच्च विचारसरणी असणारे आबा गेले तीन महिने कर्करोगाशी संघर्ष करत होते. आबांवर उपचार होत होते. त्यांचं दुखणं हे आवाक्याबाहेरचं होतं. मी आबांना अंतकरणपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आर. आर. आपल्यात नाहीत, ही गोष्ट आम्हाला पचवण्यासाठी बराच काळ
लागेल.”

शरद पवारांनी आबांसोबतच्या आठवणींना उजाळाही दिला ते म्हणतात, “आबांची एक आठवण म्हणजे मी एकदा आर. आर. पाटील यांच्यासाठी प्रचारसभेला गेलो होतो. तेव्हा व्यासपीठावरील एकानं मला विचारलं की, या समोर आलेल्या माणसांत बसलेल्या ज्या महिला आहेत, त्यांना ओळखता का? मी नाही म्हटल्यावर त्यांनी सांगितलं की, त्या आबांच्या पत्नी आणि भगिनी आहेत. आबांनी मुंबईत बंगला असतानाही कुटुंबातील कुणाला कधीही तिथे आणलं नाही. त्यांच्या घरातले गावाकडे, शेतावर काम करत होते. मुलगी शिकत होती. बडेजाव न करता सत्तेच्या महत्त्वाच्या पदांवर असतानाही असं सामान्य परिस्थितीतच राहाणं हे आबांनी सातत्यानं सांभाळलं होतं.”

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • RAVI

    ….Dance Bar la Kayamchi bandi hich Abana khari SHRANDHANJALI….

close