‘अंजनी’ पोरकं झालं

February 17, 2015 12:40 PM0 commentsViews:

2017 फेब्रुवारी : अंजनी ते मंत्रालय…असा संघर्षमय प्रवास करणारे आर.आर.पाटील यांना आज अखेरचा निरोप दिला जात आहे. आबांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोरका झालाय. पण ज्या अंजनी गावात लहानाचे मोठे झाले त्या अंजनी गावावर आज दु:खाचा डोंगर कोसळलाय. संपूर्ण गाव स्तब्ध झालंय. लहानापासून ते अबालवृद्धांपर्यंत अवघं अंजनी गाव शोकसागरात बुडालंय.

आबांचं पार्थिव सकाळी सात वाजता अंजनीत दाखल झालं. आबांचं पार्थिव पोहचताच गावकर्‍यांच्या अश्रूंचा बांध फुटला. ज्या आबांना लहानाचं मोठं होताना पाहिलं, त्यांच्या जीवनसंघर्षाला जवळून ज्यांनी अनुभवला अशा त्यांच्या सहकारी, कार्यकर्त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले.

भिलवडी नाक्यापासून आबांची अंत्ययात्रा सुरू झाली. ‘आपला माणूस गेला’ असं बॅनर लावलेल्या ट्रकमधून आबांची अंत्ययात्रा सुरू झाली. या अंत्ययात्रेत आबांच्या समर्थकांची अलोट गर्दी लोटलीये. आपल्या या लाडक्या नेत्याला,सहकार्‍याला अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, संजयकाका पाटील, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांत पाटील, माणिकराव ठाकरे, भास्कर जाधव, पद्मसिंह पाटील आणि अण्णा हजारेही उपस्थित आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close