कॉम्रेड गोविंद पानसरेंचा जीवनप्रवास…

February 21, 2015 6:47 AM0 commentsViews:

21 फेब्रुवारी : पुरोगामित्वावर आणखी एक हल्ला झालाय. विचारांचा लढा विचारांनी संपवण्याचा हा डाव होता. कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी आयुष्यभर हा लढा लढला….कॉम्रेड गोविंद पानसरेंचा जीवनप्रवास…

Govind Pansare passes away 444प्रवाहाविरुद्ध काम करत पुढं जायचं, वादळं अंगावर घ्यायची आणि समाज परिर्वतनासाठी प्रत्येक क्षण जगायचा….गेली पाच दशकं हाच वसा घेत कॉ. गोविंदराव पंढरीनाथ पानसरे झटत राहिले…अखेर शुक्रवारी रात्री हे वादळ शांत झालं. शेकडो लढे आणि सामाजिक चळवळींच्या माध्यमातून पायाला भिंगरी बांधून पानसरेंनी महाराष्ट्र पिंजून काढला होता..अखेर तो झंझावात शांत झाला.

अहमदनगर जिल्ह्यातल्या कोल्हारमध्ये गोविंद पानसरेंचा जन्म झाला…घरात गरिबी… शिक्षणाचा गंध नाही…अशा वातावरणात वाढणार्‍या पानसरेंना मात्र ध्यास होता शिक्षणाचा…याच ध्यासापोटी वयाच्या 15 व्या वर्षी पानरसे कोल्हापुरात आले इथल्याच रांगड्या मातीनं त्यांना लढायला शिकवलं…ते जेव्हा कोल्हापुरात आले तेव्हा अंगावरच्या कपड्यांशिवाय त्यांच्याकडे काहीही नव्हतं.

अशा खडतर परिस्थितीत त्यांनी पदवी आणि कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि वकील म्हणून कामाला जोमानं सुरुवातही केली. हा प्रवास सोपा नव्हता…काही काळ त्यांनी शिपाई म्हणून नोकरीही केली, वृत्तपत्रे विकली आणि प्रसंगी रस्त्यांवर कंगवेही विकले. कुठलंच काम हलकं नसतं, श्रम केल्याशिवाय काहीच मिळत नाही याच विचारांमधूनच त्यांची कम्युनिष्ट पक्षासोबत नाळ जुळली…ती अखेरच्या श्वासापर्यंत कायम होती.

आपल्या 60 वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात त्यांनी अनेक लढे उभारले, चळवळींच नेतृत्व केलं. वर्णव्यवस्थेचं समर्थ करणार्‍या शंकराचार्यांशी उभा वादही घातला. समाजातल्या अनिष्ट रूढी, परंपरा, जातीप्रथा या विरूद्ध त्यांनी एल्गार पुकारला…यात त्यांना विरोध सहन करावा लागला, अपमान पचवावे लागले पण या सर्व परिस्थितीझी झुंज देत त्यांनी आपलं परिवर्तनाचं व्रत सुरूच ठेवलं.

‘शिवाजी कोण होता’ या त्यांच्या पुस्तकांमुळं शिवाजी महाराजांचं वेगळं रूप समाज समोर आलं. हा समाज प्रबोधनाचा वारसा पुढं नेण्यासाठी वयाच्या 82 व्या वर्षीही हा लढवय्या लढत होता…विचारांचा लढा विचारांनी जिंकता न आल्यानं प्रतिगामी शक्तींनी पुन्हा आधार घेतला बंदुकीच्या गोळीचा…कॉम्रेड शरीरानं गेलेत पण विचारांनी अमर आहेत…लढवय्या कॉम्रेडला आयबीएन-लोकमतची श्रद्धांजली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close