आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात

February 23, 2015 9:58 AM0 commentsViews:

Image img_227042_sansad343_240x180.jpg23 फेब्रुवारी : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे मात्र, हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. भूसंपादन विधेयकावरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

या अधिवेशनात सरकार सहा विधेयकांना मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. महत्त्वाच्या 5 अध्यादेशांवर ढोबळपणे सहमती झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय. विरोधकांचा सुधारित भूसंपादन कायद्यातल्या काही तरतुदींना विरोध आहे. विरोधकांच्या मनातली भीती दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी 10 ते 12 मुद्दे उपस्थित केले, त्याला इतरांनी पाठिंबा दिला. भाजप नेत्यांनी केलेली आक्षेपार्ह विधानं, धान्यासाठी किमान आधारभूत किंमत, स्वाईन फ्लू, महिलांवरचे अत्याचार, शेतीचे प्रश्न, भारत-पाक सीमावाद, शिक्षणाचं भगवीकरण, मध्य प्रदेशातला व्यापम घोटाळा, चर्चवर झालेले हल्ले, पेट्रोलियम मंत्रालयातील हेरगिरी हे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले.

पंतप्रधानांनी केलं विरोधकांना सहकार्याचं आवाहन

दरम्यान, या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांकडून सहकार्याच्या भूमिकेची अपेक्षा ठेवलीय. या अधिवेशनाकडे देश मोठ्या आशेनं पाहत असल्याचं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. हे अधिवेशन सुरळीत पार पडावं, ही सर्व पक्षांची सामूहिक जबाबदारी आहे, असंही ते म्हणाले. सर्व पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर संसदेत चर्चा करू, असं आश्वासनही त्यांनी दिलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close