‘पटकथा तीच, नायक नवा’, राज्यात काय चाललं ?, सेनेचा सवाल

February 23, 2015 10:59 AM0 commentsViews:

bejp_meet_uddhav_thacakrey23 फेब्रुवारी : जे दाभोलकर प्रकरणात झाले तेच पानसरेप्रकरणी घडत आहे. गृहखातं हे मुख्यमंत्र्यांकडेच आहे. था, पटकथा व संवाद बदलले नाहीत. नायक, खलनायक बदलून जुन्याच पटकथेवरनवा सिनेमा सुरू आहे. महाराष्ट्रात नवीन काय चालले आहे ? कोणी सांगेल काय? असा खडा सवाल शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलाय.

शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज पुन्हा घणाघाती टीका करण्यात आलीये. निमित्त अर्थातच पानसरेंच्या हत्येचं आहे. दाभोलकर आणि पानसरेंच्या हत्येवरून सामनाच्या अग्रलेखातून पटकथा तीच, नायक नवा….या शीर्षकाखाली मुख्यमंत्र्यांना जाहीर सवाल विचारण्यात आले आहे. या अग्रलेखात गृहखाते हे मुख्यमंत्र्यांकडेच असल्याचीही जाणिव करून देण्यात आलीय. या हत्यांचं अपयश मुख्यमंत्री सिस्टिमवर कदापिही ढकलू शकत नाहीत असंही या अग्रलेखातून सुनावण्यात आलं. मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी बदलले, पण प्रशासकीय व्यवस्था तीच आहे. राज्यकर्ते येत जात असतात, सिस्टीम तीच असते. मुख्यमंत्र्यांना ती मान्य नसेल तर त्यांनी सिस्टीमचा चेहरा बदलायला हवा. सरकार बदलले, पण महाराष्ट्रात काय बदलले ? असाही सवाल विचारण्यात आलाय.

अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय ?

‘पटकथा तीच, नायक नवा….’जे दाभोलकर प्रकरणात झाले तेच पानसरेप्रकरणी घडत आहे. कथा, पटकथा व संवाद बदलले नाहीत. नायक, खलनायक बदलून जुन्याच पटकथेवरनवा सिनेमा सुरू आहे. पानसरे हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 20 टीम स्थापन केल्या आहेत. दाभोलकरांच्या वेळीही अशा टीम स्थापन झाल्याच होत्या. महाराष्ट्रात नवीन काय चालले आहे? कोणी सांगेल काय? ठरा महिन्यांनंतरही दाभोलकरांचे मारेकरी सापडलेले नाहीत व कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे खुनी अद्यापही मोकाटच आहेत. दाभोलकरांचा खून झाला तेव्हा तत्कालीन गृहमंत्र्यांचा राजीनामा जोरात मागितला गेला होता. आता विरोधक नेमके तेच करीत आहेत. पानसरे यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असे आश्‍वासन गृहखाते सांभाळणार्‍या मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. दाभोलकरांची हत्या झाली तेव्हा कॉंग्रेसचे मुख्यमंत्री व राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनी नेमके हेच आश्‍वासन दिले होते की, ‘‘दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना पकडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू.’’ पण दाभोलकरांचे मारेकरी अजूनही गायब आहेत व पानसरे यांच्या मारेकर्‍यांसंदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी तेच विधान केले. पानसरे यांच्या मारेकर्‍यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आणखी एक जोरकस विधान केले आहे ते म्हणजे ‘‘पोलिसांनी ताकद लावली तर आरोपी पकडण्यात निश्‍चित यश मिळेल!’’ मुख्यमंत्र्यांचे हे विधान गमतीचे आहे व पोलिसांवर खापर फोडणारे आहे. ज्या पोलिसांवर ते अविश्‍वास दाखवीत आहेत ते गृहखाते स्वत: मुख्यमंत्री सांभाळीत आहेत. पोलिसांनी जोर लावावा म्हणजे नेमके काय करावे? याबाबत नामदार मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले नाही. पानसरे यांचे खुनी शोधण्यात पोलीस चालढकल करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते अपयश गृहखात्याचे आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close