बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेसची यादी उशिरा

September 21, 2009 2:28 PM0 commentsViews: 5

21 सप्टेंबर बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करायला विलंब लावला जात आहे. पण तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात बंडखोरी आणि पक्षांतर्गत गटबाजीला यंदा काँग्रेसला सामोरं जावं लागेल, असं दिसतंय. राष्ट्रपतीच्या मुलाला म्हणजे रावसाहेब शेखावत यांना अमरावतीचं तिकिट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं तिथले विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री सुनील देशमुख यांनी आधीच बंडाचं निशाण रोवलं. मतदारसंघांची पुनर्रचना झाली आहे. त्यामुळे अनेक विद्यमान आमदार आणि वरिष्ठ नेते आपल्याला सेफ असलेल्या मतदारसंघाची निवड करत आहेत. नारायण राणे यांनाही कणकवली ऐवजी कुडाळमधून लढायचं आहे. त्यामुळं राणेंच्या विरोधात बंड करण्याचा इशारा पुष्पसेन सावंत यांनी दिला आहे. काँग्रेसच्या किमान शंभरेक जागांवर बंडखोरी होईल, याची जाणीव पक्षश्रेष्ठींना आधीच आली आहे. पक्षच घराणेशाहीच्या जोरावर वाढल्यामुळं वारसदारांना डावलणं पक्षश्रेष्ठींना शक्यच नाही. त्यातच इलेक्टिव्ह मेरिटचा कितीही आव आणला तरी आर्थिक हितसंबंधातल्या लोकांची वर्णी लागेल, हे उघड उघड दिसतंय. त्यामुळेच उमेदवारांची यादी दोन- तीन टप्प्यात जाहीर करण्याचं काँग्रेसनं ठरवलं आहे. त्यातही पक्षांतर्गत गटबाजीनं ग्रासलेल्या जागांवरच्या उमेदवारांना तर अगदी वेळेवर अर्ज भरायला सांगण्यात येणार आहेत. बंडखोरी टाळायची असेल तर आपलीच नाही, तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादीसुद्धा उशिरा जाहीर व्हायला हवी, हे काँग्रेसच्या ध्यानात आलं आहे. त्यामुळंच काँग्रेसची नेतेमंडळी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना बरोबर घेऊन दिल्लीतच सर्व जागा फायनल करतायत, अशी चर्चा आहे.

close