राष्ट्रवादीत बंडखोरीचं पीक

September 21, 2009 2:43 PM0 commentsViews: 7

21 सप्टेंबर शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीतही जोरदार बंडखोरी होण्याची चिन्हं आहेत. सोलापूर जिल्ह्यात बबन शिंदेंच्या रुपाने त्याची झलक दिसली. राष्ट्रवादीतल्या या बंडाचं लोण राज्यभर पसरेल याचे स्पष्ट संकेत मिळतायत. बबनदादांचा स्वाभिमान दुखावला आहे. विजयसिंहांसारख्या राजकीय हाडवैर्‍याला आपल्या मतदारसंघात स्विकारणं त्यांना शक्यच नव्हतं. अखेर माढ्यात त्यांनी बंडाचा झेंडा रोवला आहे. बबनदादांसारखेच बार्शीचे (सोलापूर) दिलीप सोपल, बंडखोरीच्या वाटेवर आहेत. पंढरपूरचे (सोलापूर) भारत भालके, जिंतूरचे (परभणी) विजय भांबळे, भोरचे (पुणे) तालुकाध्यक्ष भालचंद्र जगताप, कराड -उत्तरचे (सातारा ) अतुल्य भोसले किंवा बाळासाहेब पाटील. सावंतवाडीचे (सिंधुदूर्ग) प्रवीण भोसले किंवा दीपक केसरकर. जोगेश्वरी पूर्वचे (मुंबई) दिनकर तावडे. ठाणे शहरचे देवराम भोईर. राष्ट्रवादीत अशी घाऊक बंडखोरी होऊ घातली आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बंडखोरी करतील. काही ठिकाणी पक्ष सोडून जातील तर, काही ठिकाणी ते थेट विरोधकांना मदत केल्याशिवाय राहणार नाहीत. या फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावण्याचं काम राष्ट्रवादीला करावंच लागणार आहे. त्यामुळेच अधिकृत उमेदवारांना पक्ष अगदी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीच एबी फॉर्म देईल आणि बंडखोरी कमी करता येते का ते पाहील अशी चर्चा राष्ट्रवादीत आहे.

close