‘स्पेशल 26′ दरोडा ; फळ विक्रेते बनून आले आणि 2.5 कोटी लुटले !

February 25, 2015 8:15 PM0 commentsViews:

virar34225 फेब्रुवारी : विरारमध्ये एका सराफाच्या दुकानात फिल्मी स्टाईलने दरोडा घालण्यात आलाय. सदरची घटना ऐकून कुणाच्याही भुवया उंचावातील. फळे विक्रेत्याच्या बहाण्याने चोरांनी अगोदर सराफाच्या दुकानाच्या शेजारी एक दुकान भाड्याने घेतलं आणि पंधरा दिवसांनी सराफ दुकान फोडून हातसाफ केला. या चोरीत तब्बल 2 कोटी 41 लाखाचा माल लंपास करण्यात आला. ओमकार ज्वेलर गोकुळटाऊनशिप विरार पश्चिम येथे ही घटना घडली.

एका चित्रपटाची कथा शोभेल असा सुनियोजित कट चोरट्यांनी रचला. करोडोची चोरी करण्यासाठी एखाद लाखाची गुंतवणूक करून हा कट रचण्यात आला. विरार पश्चिममधील ओमकार ज्वेलरला लागूनच असलेला एका गाळा चोरट्यांनी भाडे तत्वावर घेऊन त्यात फळाचे दुकान सुरू केले. आणि ओमकार ज्वेलरवर रेकी करण्यात सुरूवात केली. आणि मंगळवारी रात्री वेळेचा फायदा घेऊन त्यांनी ओमकार ज्वेलरच्या दुकानाची भिंत तोडून चोरी केली.

आज सकाळी ज्वेलरचे मालक आशिष शेलार नेहमी प्रमाणे सकाळी 9. वाजता दुकान उघडण्यासाठी गेले असता सर्व प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली, सदरची चोरी सराफाच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून करण्यात आली.

चोरट्यांनी आशिष शेलार यांच्या दुकानावर रेकी करून आशिष शेलार यांच्या दुकानाला लागून असलेला रिकामा गाळा 10 ते 15 दिवसांपूर्वी फळ विक्रीसाठी भाडे तत्वावर घेतला होता. या गाळ्यात फळाचे दुकान चालू करण्यात आले होते. आणि येथूनच हा कट शिजला. काल रात्री या दुकानातील चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात आपले काम साधले. अशोक शेलार यांच्या दुकानाची भिंतीला भगदाड पाडून तब्बल 2 कोटी 41 लाखाचा माल चोरी केला. यात 6 किलो सोने 40 किलो चांदी आणि 15 लाखांची रोकड असा माल चोरीला गेला.. इतकंच नाही तर चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्याची हार्ड डिस्क पण चोरून नेली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

सदरच्या घटनेवरून सराफांच्या सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा ऐराणीवर आला आला आहे. विरार ज्वेलर असोसियशनने सदर घटनेचा निषेध करत सर्व दुकाने बंद केली आहेत. जोपर्यंत या चोरीचा छडा लावत नाही तोपर्यंत दुकानं बंद राहणार असा इशारा दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close