प्रभू एक्स्प्रेस सुसाट, नव्या गाड्या आणि भाडेवाढही नाही !

February 26, 2015 3:38 PM0 commentsViews:

rail budget 2015_suresh prabhu26 फेब्रुवारी : कोणत्याही नव्या गाड्यांची घोषणा नाही, तिकिटांच्या दरात वाढ नाही असा समतोल साधत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज पहिलं बजेट सादर केलं. आपल्याकडे इतकं सारं काही आहे तर रेल्वेचा पुनर्जन्म का शक्य नाही? असा आशावाद व्यक्त करत रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे बजेटला पुनर्जन्म देण्याचा प्रयत्न केलाय. रेल्वेवर होणारा अतिरिक्त खर्चाचा भार टाळत रेल्वेमंत्र्यांनी सुविधांची खैरात केलीये.

मोदी सरकारनं दुसरे रेल्वे बजेट सादर करून पुन्हा एकदा सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन’चा दिलासा दिलाय. आजच्या रेल्वे बजेटमध्ये रेल्वेची सध्याची स्थिती पाहता निव्वळ घोषणांचा पाऊस पाडण्यापेक्षा आधुनिककरण आणि गुंतवणुकीवर भर देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.  रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बजेट सादर करताना रेल्वेसमोर असलेली पाच लक्ष्य त्यांनी यावेळी सभागृहासमोर मांडली. प्रवासीकेंद्रीत सेवा, सुरक्षित रेल्वे प्रवास, अद्ययावत पायाभूत सुविधा, आर्थिक स्वयंपूर्णता आणणं आणि 8 लाख 50 हजार कोटींची पुढच्या पाच वर्षांत गुंतवणूक यावरही त्यांनी भर दिला. रेल्वेचं जाळं आणखी पसरवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

रेल्वेमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अधिक गुंतवणूक केली जाणार आहे. पुढच्या पाच वर्षात रेल्वेत आमुलाग्र बदल अपेक्षित आहेत. मल्टी नॅशनल बँक्स आणि इतर घटक आर्थिक वाटा उचलायला तयार असल्याचं ते म्हणाले. स्वच्छ रेल, स्वच्छ भारत कार्यक्रम राबवला जाईल. नवीन टॉयलेट्स 6500 स्टेशन्सवर 17 हजार नवीन टॉयलेट्स बांधली जाणार आहेत. कोचेसमध्ये बायो टॉयलेट्सची सोय केली जाणार आहे. 138 हेल्पलाईनवर प्रवाशांच्या समस्या आणि तक्रारी घेतल्या जातील तर सुरक्षेविषयी टोल फ्री नंबर 182 हा असणार आहे.

तिकिटांसाठी आता तासंतास थांबावं लागणार नाही. रेल्वे ऑपरेशन पाच मिनिटं राबवलं जाईल आणि पाच मिनिटांत तिकिट मिळू शकेल. डेबिट कॉर्डऑपरेटेड मशीन्स आणली जातील. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कॅमेरे लावले जाणार आहेत. त्याचबरोबर आता जनरल क्लासमध्येही मोबाईल चार्जिंग सुविधा असेल. व्हीलचेअरचं ऑनलाईन बुकींग उपलब्ध करून दिलं जाईल. मुंबईत एसी ट्रेन सुरू करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. तसंच आगामी काळात 6600 किमी रेल्वे ट्रॅकचं तातडीने विद्युतीकरण हाती घेणार असल्याचंही सुरेश प्रभुंनी यावेळी जाहीर केलं.

रेल्वे बजेटवर शिवसेना नाराज

सुरेश प्रभूंच्या बजेटवर शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. पायाभूत सुविधा, औद्योगिक वाढ, कृषी क्षेत्राची वाढ होण्याच्या दृष्टीने या रेल्वे बजेटमध्ये पावलं उचलली नाहीत. नवीन रेल्वे प्रकल्पही नाही ही निराशाजनक बाब अशी नाराजी शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केली. तर शिवसेनेची नाराजी हा नेहमीचा विषय झालाय असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलाय. या बजेटमुळे देशातली रेल्वे रूळावर आणण्याचं काम करण्यात आलंय.
कुठल्याही प्रदेशाला नाही तर सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेऊन बजेट मांडलंय असा दावाही रावसाहेब दानवेंनी केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close