अभिजात दर्जा म्हणजे काय रे भाऊ ?

February 27, 2015 10:11 AM0 commentsViews:

 marathi pkgराजेंद्र हुंजे, मुंबई

27 फेब्रुवारी : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारनं प्रा.रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून त्याचा अहवाल केंद्र सरकारकडं सादर केलाय. अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय आणि मराठी भाषेला किती मोठा इतिहास आहे, याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट पाहुयात….

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी….’मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचे जवळपास सर्व प्रयत्न पूर्ण होत आलेत….आता बाकी आहे ती फक्त घोषणा…अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता मूर्त स्वरुप मिळण्याची वेळ आली आहे. प्रा.रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखालील समितीनं पाचशे पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केलाय. आतापर्यंत केंद्रानं तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेला हा दर्जा दिलाय. पण नेमका अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय ?

- ज्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं ती भाषा अभिजात
– त्या भाषेला दीड ते अडीच हजार वर्षांचा इतिहास हवा
– त्या भाषेला भाषिक आणि वाडःमयीन परंपरेचे स्वयंभूपण असावे
– प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा

एकूण 52 बोली भाषेपासून आपली मराठी भाषा नटलेली आहे. मराठी भाषेची महती दुर्गाभागवतांचे आजोबा राजारामशास्त्री भागवत यांनी 1885 साली, तर ज्ञानकोषकार श्री. व्यं. केतकर यांनी 1927 सालीच त्यांच्या ग्रंथांमधून लिहून ठेवली आहे. मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीही राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

अभिजनांची भाषा म्हणजे अभिजात भाषा असा आतापर्यंत प्रस्थापित समज होता. पण प्रा. रंगनाथ पठारे समितीनं आपल्या अहवालातून त्याची उत्तम मांडणी केली आहे. मराठीचं वय 800 वर्षे सांगितलं गेल्यामुळंही त्याला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अडथळे येत होते. मराठी ही संस्कृतपासून जन्माला आली हा गैरसमज पुराव्यानिशी दूर करण्याचा प्रयत्न पठारेंनी त्यांच्या अहवालाच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळं आता आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या केवळ एक पाऊल दूर आहोत.

गाथा सप्तशती हा मराठीतील मूळ ग्रंथ असल्याचा पुरावाही पठारे समितीनं सादर केला आहे. त्यामुळं या भाषेचं वय दोन हजार वर्षांपूर्वीचं आहे, याचा अंदाज येऊ शकेल. मराठी ही फक्त प्राचीन भाषा आहे असं नाही तर, तिच्यात श्रेष्ठ साहित्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे. म्हणूनच मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मागणी होतेय.

अभिजात दर्जा म्हणजे काय रे भाऊ?
– भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावं
– भाषेचं वय दीड ते अडीच हजार वर्षांचं असावं
– भाषेला स्वतःचं स्वयंभूपण असावं
– प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close