राज्यभरात अवकाळी पावसाचा पिकांना फटका, शेतकरी हवालदिल

March 1, 2015 6:04 PM0 commentsViews:

01 मार्च : राज्यात काल (शनिवारी) अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह रत्नागिरी, सातारा, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यात काल सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर अनेक ठिकाणी पाऊस पडला. काही ठिकाणी आजही अवकाळी पाऊस सुरूच आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगांच्या गडगडाटात पाऊस पडण्याची आणि गारपीट होण्याचीही शक्यता हवामान खात्याने दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे विदर्भात संत्रा, गहू, हरभरा, मराठवाड्यात डाळिंब, ज्वारी, भूईमूग तर कोकणात आंबा आणि काजू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होतं आहे.

आधी खरीप, आता रब्बी
अमरावती जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचं खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. आता रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांचंही नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेतकरी हवालदिल
बारामतीत काल रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरूचं आहे. या पावसाचा फटका द्राक्ष, गहु, हरभरा, केळी, डाळिंब या पिकांना बसणार आहे. या शिवाय विषाणूजन्य रोगरायीला शेतकर्‍याला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे याभागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

आजार बळावण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासूनच अवकाळी पाऊस सुरू आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अशा प्रकारे अवकाळी पाऊस सुरू झाल्याने शेतकर्‍यांनी जीवापाड जोपासलेल्या गहू, ज्वारी, हरभरा या पिकांसह आंबा, चिंच, मोसंबी या पिकांचंही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे साथीचे आजारही बळावण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पाऊस होता, सध्या रिमझिम सुरू आहे.

गहू, हरभर्‍याचे नुकसान
जळगावात दिवसभर ढगाळ वातावरण होते. अमळनेर तालुक्यात सायंकाळी वादळासह हलका पाऊस झाला. त्यामुळे गहू, हरभरा पिकांचं नुकसान झाले. राज्याच्या काही भागांत गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संततधार आणि ढगाळ वातावरण कायम
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही आज अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे बळीराजा आता पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. कोल्हापूर शहरात मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असून आजही सकाळपासूनही पावसाची संततधार आणि ढगाळ वातावरण कायम आहे. शाहूवाडी, गडहिंग्जल, शिरोळ भागातही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हा पाऊस आता थांबणार की सुरूच राहणार या चिंतेत बळीराजा आहे. तर सांगली जिल्ह्यातही पावसामुळं द्राक्षं आणि बेदाण्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले असून, तापमानात वाढ झाली आहे.

रत्नागिरीत आंब्याचे नुकसान
कोकणातही कालपासून पाऊस आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. आता पावसाची रिमझिम सुरूच आहे. रायगडमध्ये अलिबाग तर रत्नागिरीत खेड, चिपळूण, गुहागरमध्ये जोरदार पाऊस झाला. ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सध्या सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. हे ढगाळ वातावरण दोन दिवस अजून राहिलं तर या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

द्राक्षाला फटका
नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसाचा द्राक्ष बागांबरोबर कांदा, गहू आदी पिकांना फटका बसला. जिल्ह्यातील निफाड, येवला, इगतपुरी, मालेगाव, बागलाण आदी ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले. 2 महिन्यांपूर्वी या भागाला गारपिटीचा मोठा फटका बसला होता. यातच हवामान खात्याने पुढच्या 2 दिवसांत गारपीट होण्याची शक्यता वर्तवल्याने शेतकर्‍यांच्या चिंता वाढली आहे.

ऊसतोडणी थांबली
सातारा जिल्ह्यात दुपारपासून सुरू झालेला हलक्या स्वरूपाचा पाऊस रात्री उशिरापर्यंत चालू होता. माण, खटाव, सातारा, वाई, महाबळेश्‍वर, वाई तालुक्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे ऊस तोडणीची कामे थांबली.

पुण्यात 8.8 मिमी पाऊस
पुण्यात दिवसभर वातावरण ढगाळ होते. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पावसाने तुरळक हजेरी लावली. पण, त्यानंतर पावसाचा जोर वाढला. रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात 8.8 मिमी पावसाची नोंद झाली.

पावसाचे कारण काय?
पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्वेकडून आणि पश्चिमेकडे वारे वाहत आहेत. ते एकमेकांना भिडत असल्याने पाऊस पडत आहे. महाराष्ट्राच्या सर्व प्रदेशांबरोबरच गुजरातमध्ये कच्छ-सौराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही पाऊस पडत आहे.

आणखी किती दिवस पडणार?
सध्या सुरू असलेला पाऊस सोमवापर्यंत (2 मार्च) कायम राहील. तो रविवारी व सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात पडेल. यापैकी काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटात पाऊस पडण्याची आणि गारपीट होण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर ओसरेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close