निवडणुकीची धामधूम सुरू

September 23, 2009 1:11 PM0 commentsViews: 12

23 सप्टेंबर निवडणुकीची धामधूम बुधवारपासून खर्‍या अर्थानं सुरू झाली. कारण दिवस गाजला तो दिग्गज नेत्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याने मुंबईसह राज्यभरात अनेक नेत्यांनी तसंच चर्चेतल्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज भरले. मंुबईत घाटकोपर पश्चिममधून भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेेच्या श्वेता परुळकर आणि प्रकाश महाजन उपस्थित होते. पूनम यांची आई रेखा महाजन या त्यांच्या स्टार प्रचारक असणार आहेत. तर राहुल महाजनही प्रचारात मदत करणार आहेत. जळगाव शहर मतदारसंघातून युतीचे उमेदवार म्हणून सुरेशदादा जैन यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केला. जैन सेना-भाजप युतीचे उमेदवार असल्यानं त्यांच्यासोबत भाजपचे आमदार एकनाथ खडसे, आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी उपस्थित होते. जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेना उमेदवार विद्यमान आमदार गुलाबराव पाटिल यांनी आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार अनिल पाटिल यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रत्नागिरीचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार उदय सामंत यांनिही बुधवारी आपली उमेवारी दाखल केली. रत्नागिरी शहरात यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. सामंत यांची ही दुसरी निवडणूक असून यावेळी सेना-भाजपा उमेदवारासहीत त्यांना सहा प्रतिस्पर्धी उमेदवारांचा सामना करावा लागणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवस बाकी आहेत. त्यामुळे बुधवारी ठिकठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू होती. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघातून अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यासाठी ते मोटार सायकलवर बसून गेले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी सांगलीतल्या पलूस-कडेगावमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. पुणे जिल्ह्यातल्याच भोरमधून काँग्रेसचे नेते अनंतराव थोपटे यांनी अर्ज दाखल केला आहे.या वेळी त्यांचा मुलगा संग्राम थोपटे यांनीही आपला अर्ज दाखल केला. तर मनसेचे उमेदवार बाळ नांदगावकर यांनी मुंबईतल्या शिवडी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

close