फडणवीस दिल्लीच्या तालावर चालणारे मुख्यमंत्री – राज ठाकरे

March 1, 2015 4:14 PM0 commentsViews:

raj_thakare_nasik

01 मार्च : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस दिल्लीत बसलेल्यांच्या तालावर चाललात, असा टोमणा मारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवारी) युती सरकारला खडे बोल सुनावले आहेत. मोदी आणि शहांनी ऊठ म्हटलं की मुख्यमंत्री उठतात, बस म्हटलं की ते बसतात असा टोला फडणवीसांना लगावला आहे.

रविवारी नाशिकमध्ये मनसेच्या वीज कामगार सेनेचे अधिवेशन होते. या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटनानंतरच्या भाषणात राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली.

सध्या सरकारमध्ये सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, हेच कळत नसल्याचं सांगत भांडणातून वेळ मिळाला तर जनतेकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल असं म्हणत राज ठाकरेंनी एकाच वेळी सेना-भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

विधानसभा निवडणुकीत ‘पवारांच्या राजकारणातून महाराष्ट्राला मुक्त करा’ असा नारा देणारे पंतप्रधान आता त्यांचंच कौतुक करतात, अशी टीका करत नाशिकमध्ये आम्ही राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेतला होता त्यावेळी आमच्यावर टीका झाली अशी आठवणही त्यांनी करून दिली. राज ठाकरेंनी याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीवर कार्टूनच्या माध्यमातून टीका केली होती.

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवण्याचा घाट घातला असून याच्याशी राज्यातील सत्ताधार्‍यांना त्याच्याशी काही घेणेदेणे नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. पाण्याच्या बाबतीत उत्तर महाराष्ट्राची परिस्थितीही मराठवाड्यासारखी होईल असं सांगत नारपार नदीचं पाणी पळवून गुजरातला नेत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close