बीसीसीआयच्या अध्यक्षपदी जगमोहन दालमियांची बिनविरोध निवड

March 2, 2015 1:27 PM0 commentsViews:

dal

02 मार्च : बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून जगमोहन दालमिया यांच्या नावावर आज (सोमवारी) शिक्कामोर्तब झालं. आज चेन्नईमध्ये झालेल्या बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. जगमोहन दालमिया यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तर बीसीसीआयच्या सचिवपदी अनुराग ठाकूर यांची निवड झाली आहे. अनुराग ठाकूर यंदाच्या निवडणुकीत शरद पवार गटाकडून लढत होते. सचिवपदाच्या लढतीत ठाकूर यांनी विद्यमान सचिव संजय पटेल यांच्यावर अवघ्या एका मतानं विजय मिळवला. त्यामुळे श्रीनिवासन यांना हा मोठा झटका मानला जात आहे.

किंवा ठाकूर यांचा अपवाद वगळता शरद पवार गटातील इतर सर्व उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे. यामध्ये राजीव शुक्ला, ज्योतिरादित्य शिंदे, रवी सावंत यांचा समावेश आहे. त्यामुळे बोर्डाच्या कार्यकारिणीत श्रीनिवासन गटाचंच वर्चस्व कायम राहिलं असून इतर पदांमध्ये शरद पवार यांच्या गटाला जोरदार दणका बसला आहे.

बोर्डाच्या संयुक्त सचिवपदाच्या निवडणुकीत अमिताभ चौधरी यांनी पवार गटाचे चेतन देसाई यांचा पराभव केला. तर राजीव शुक्लांना हरवून अनिरुद्ध चौधरी नवे खजिनदार बनले आहेत.

बीसीसीआयच्या पाच विभागीय उपाध्यक्षांपैकी तिघांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे इथेही शरद पवार गटाला जोरदार धक्का बसला आहे. दक्षिण विभागातून गोकाराजू गंगाराजू, पूर्व विभागातून गौतम रॉय आणि उत्तर विभागातून मोती लाल नेहरू यांची थेट निवड झाली. मध्य विभागातून उपाध्यक्षपदाच्या लढतीत सी के खन्ना यांनी ज्योतीरादित्य सिंदिया यांचा पराभव केला. तर पश्चिम विभागात रवी सावंत यांना हरवून टी सी मॅथ्यूज उपाध्यक्ष बनले.

  • बीसीसीआयची नवी कार्यकारिणी

जगमोहन दालमिया : अध्यक्ष
अनुराग ठाकूर : सचिव
अमिताभ चौधरी : संयुक्त सचिव
अनिरुद्ध चौधरी : खजिनदार

  • बीसीसीआयचे नवीन उपाध्यक्ष

वेस्ट झोन उपाध्यक्ष – टी. सी. मॅथ्यू
साऊथ झोन उपाध्यक्ष – जी. गंगाराजू
सेंट्रल झोन उपाध्यक्ष – सी. के. खन्ना
ईस्ट झोन उपाध्यक्ष – गौतम रॉय
नॉर्थ झोन उपाध्यक्ष – एम. एल. नेहरू

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close