दुष्टचक्र संपता संपेना !

March 2, 2015 3:58 PM0 commentsViews:

02 मार्च : राज्यामध्ये तिसर्‍या दिवशीही अवकाळी पाऊस सुरूच आहे. या अवकाळी पावसाने शेतकरी संकटात आला आहे. कारण खरीपापाठोपाठ रब्बीचंही पीक हातचं जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं द्राक्षं, डाळिंब आणि भाजीपाला संकटात आलाय तर विदर्भ आणि मराठवाड्यात ज्वारी, गहू, हरभर्‍याला फटका बसलाय. कोकणातही आंबा आणि काजू बागायतीला फटका बसला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पडणारा हा अवकाळी पाऊस आणखी काही दिवस पडण्याची शक्यता आहे.

आधी महादुष्काळ, नंतर लागोपाठ झालेल्या सलग तीन गारपिटांचे फटकारे आणि आता पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा… या अस्मानी संकटाच्या दुष्टचक्रात राज्यातला शेतकरी पुरता उद्‌ध्वस्त झाला आहे. पण मायबाप सरकार अजूनही गेल्या वेळचीच नुकसानभरपाई बळीराजापर्यंत पोहोचवू शकलेलं नाही. अशातच कालच्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने हातातोंडाशी आलेलं पीकही भुईसपाट करून टाकलं आहे. एवढंच नाहीतर कालच्या या वादळी पावसाने आतापर्यंत तिघांचे बळी देखील घेतले आहेत.

अवकाळी पावसाने एका रात्रीतून राज्यभरातल्या शेती पिकांचं होत्याचं नव्हतं करून टाकलं आहे. कुठे काढणीला आलेला गहू भुईसपाट झालाय तर कुठे संत्रा, मोसंबीचा सडा पडलाय. अगदी आंब्या-द्राक्षांच्या बागाही अवकाळीच्या तडाख्यातून वाचू शकलेल्या नाहीत. किंबहुना या नगदी पिकांचंच सर्वाधिक नुकसान झालं आहे. काही ठिकाणी तर शेतकर्‍यांनी तीनदा पेरणी करूनही ते शेतातलं पीक घरापर्यंत नेऊ शकलेलं नाही.

हा अवकाळी पाऊस राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कोसळला. नागपूरपासून ते रत्नागिरीपर्यंत, नाशिकपासून ते औरंगाबादपर्यंत, सगळ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शेती पिकं आणि फळबागांची नासाडी केली आहे. विदर्भात संत्रा, मोसंबीच्या बागांना तडाखा बसलाय तर नाशकात द्राक्षांच्या बागांना. पश्चिम महाराष्ट्रात तर हातातोंडाशी आलेली रब्बीची पिकंच नासाडून गेली आहेत. गहू, हरभरा, ज्वारी या तिन्हीही तयार पिकांची अवकाळी पावसाने पूर्णपणे नासाडी केली आहे. कोकणातला फळांचा राजा ‘हापूस आंब्याचं अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यात ढगाळ वातावरणामुळे हापूस आंबा आता धोक्यात येण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

या अवकाळी पावसाने मराठवाड्यातील बळीराजा सर्वाधिक हवालदिल झाला आहे कारण गेल्या वर्षीचा महादुष्काळ आणि त्यानंतर गारपिटीचा तडाखा अशा संकटांच्या मालिकेतून कसंबसं वाचवलेलं पीकचं अवकाळीने जागच्या जागीच उद्‌ध्वस्त करून टाकलं. त्यामुळे जगायचं तरी कसं, असा आर्त सवाल बळीराजा विचारतोय. अन् मायबाप सरकारमधले मित्रपक्ष मात्र परस्परांची उणीधुणी काढण्यातच धन्यता मानताहेत. म्हणूनच आतातरी सरकारने खाडकन डोळे उघडून बळीराजाला या अस्मानी आणि सुलतानी संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीची आर्थिक मदत द्यावी, नाहीतर राज्यात पुन्हा आत्महत्यांचं सत्रं सुरू व्हायला फारसा वेळ लागणार नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close