ठाण्यात मवाली रिक्षावाल्यांचा उच्छाद, 2 महिन्यांत 16,600 तक्रारींचा पाऊस

March 3, 2015 5:58 PM0 commentsViews:

thane auto_ठाणे (03 मार्च) : ‘रिक्षा खाली नही हैं, उधर नही चलेंगा, रिटर्न भाडा लगेंगा’ अशी अरेरावी करणार्‍या रिक्षाचालकांची आता मवालीगिरीही दिवसेंदिवस वाढत असून याचा प्रत्यय दोन दिवसांपूर्वी दोन तरुणींना आलाय. रिक्षावाल्याच्या मवालीगिरीमुळे या दोन तरुणांनी धावत्या रिक्षातून उडी मारावी लागली. या अगोदरही स्वप्नाली लाड या तरुणींनी धावत्या रिक्षातून उडी घेतली होती. रिक्षाचालकांची किती दादागिरी चालते, याची थक्क करणारी आकडेवारी आयबीएन लोकमतच्या हाती लागलीय. ठाण्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये रिक्षावाल्यांवर 16 हजार 600 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांशी उद्धटपणाने वागणे, भाडे नाकारणे, लायसन्स नसताना रिक्षा चालवणे, वाहतुकीचे नियम मोडणे अशा तक्रारींवरून या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. एवढंच नाहीतर आतापर्यंत 22 हजार 503 रिक्षांची तपासणी करण्यात आलीय. आणि या कारवाईमध्ये तब्बल 1506 रिक्षाचालक दोषी आढळले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 466 रिक्षाचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. तर 403 रिक्षाचालकांचे परवाने कायमचे रद्द झाले आहेत. तर आतापर्यंत रिक्षाचालकांकडून 39 लाख 26 हजार दंड आकारण्यात आला आहे. पण तरीही रिक्षाचालकांनी दादागिरी काही कमी झाली नसून त्रास देतोय रिक्षावाला असं म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आलीये.

ठाण्यात रिक्षाचालकांची दादागिरी

- ठाण्यात गेल्या 2 महिन्यांत 16 हजार 678 केसेस
- आतापर्यंत 22 हजार 503 रिक्षांची तपासणी
- या कारवाईत 1506 रिक्षाचालक दोषी आढळले
- जादा भाडे आकारल्याबद्दल-186
- क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी- 286
- भाडे नाकारणे- 94
- उद्धट वागणूक- 33
- इतर केसेस- 799
- 466 रिक्षाचालकांचे परवाने निलंबित
- 403 रिक्षाचालकांचे परवाने रद्द
- आतापर्यंत रिक्षाचालकांकडून 39 लाख 26 हजार दंड आकारण्यात आला आहे

ठाणे वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू केलेत. रिक्षाचालकांविषयी कुठलीही तक्रार असेल तर या नंबरवर फोन करून तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

हेल्पलाईन नंबर 1 – 8286400400
हेल्पलाईन नंबर 2 – 8286300300
 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close