मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शेतकर्‍याच्या घरी मुक्काम

March 4, 2015 8:53 AM1 commentViews:

CM in Yawatmal

04 मार्च :   दोन दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसाचा फटका संपूर्ण राज्याला सोसावा लागला आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्याला तर या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (मंगळवारी) आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. एवढचं नाही तर तिथल्याचं एका शेतकर्‍याच्या घरी त्यांनी मुक्कामही केला.

यवतमाळ जिल्ह्याचा पिंपरी गावातल्या विष्णू ढुमणे या शेतकर्‍याच्या घरी काल मुख्यमंत्र्यांनी मुक्काम केला आणि झुणका-भाकरीचा पाहुणचारही घेतला. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपण हा मुक्काम केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आता मुख्यमंत्री गावात थांबल्यामुळे आणि त्यात एका शेतकर्‍याच्या घरी मुक्काम केल्यामुळे गावात चर्चा तर होणारचं. पण, मुख्यमंत्र्यांच्या अशा मुक्कामामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही आठवण ताजी झाली. राहुल गांधींनीसुद्धा 2009मध्ये यवतमाळच्या कलावती बांदुरकर या विधवा शेतकरी महिलेच्या घरी मुक्काम केला होता. यावर भाजपने टीकाही केली होती.

महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या लोकसभेच्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेची आठवण काढत राहुल गांधींचं हे ‘गरिबी पर्यटन’ असल्याचं म्हटलं होते. जसं ‘इको टूरिझम’ असतं, ‘फार्म टुरिझम’ असतं तसंच राहुल गांधींसाठी हे ‘पोवर्टी टूरिझम’ असल्याची घाणाघाती टीका मोदी यांनी केली होती. पण आता दिवस पालटले, आता त्याच यवतमाळ जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका शेतकर्‍याची घरी मुक्काम केला. राहुल गांधींच्या मुक्कामामुळे कलावतीच्या परिस्थितीत बदल झाला. पण, विदर्भातल्या आत्महत्या काही थांबल्या नाही. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौर्‍यामुळे शेतकर्‍यांमध्ये किती विश्वास निर्माण होतो, हे पाहवं लागणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Amol

    aslya faltu gosti karanya peksha shetkaryanche pranshna sodvavet..

close