‘निर्भया’वरील डॉक्युमेंटरी दाखवण्यावर अखेर बंदी !

March 4, 2015 10:37 AM0 commentsViews:

delhi rape case

04 मार्च :  दिल्ली निर्भया बलात्कारातला दोषी मुकेश सिंहच्या मुलाखतीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बीबीसीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. शिवाय बीबीसीनं बनवलेली डॉक्युमेंटरी दाखवण्यावर माहिती आणि प्रसारण खात्यानं बंदी घातली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंबंधीचा अहवाल मागितला आहे.

लेस्ली उडविन या परदेशी फिल्ममेकरने ‘बीबीसी’साठी ‘इंडियाज डॉटर’ ही डॉक्युमेंटरी बनवली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘बीबीसी-4’वर ती दाखवली जाणार आहे. या डॉक्युमेंटरीत या प्रकरणातला दोषी मुकेश सिंहने “आपल्या कृत्याला पीडित मुलगीच जबाबदार” असल्याचं म्हटलं आहे. या घटनेसाठी निर्भयालाच दोषी ठरवल्यामुळे सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुकेश सिंह सध्या तिहार जेलमध्ये आहे. या डॉक्युमेंटरीसाठी उडविन यांनी तिहार तुरुंगात जाऊन मुकेश सिंहची मुलाखत घेतली. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये कुणाचेही नाव नाही. मीडिया रिपोर्टनुसार ‘निर्भया’ शॉर्टफिल्ममध्ये कायद्याचं उल्लंघन करणार्‍या काही बाबी समोर आल्याचं दिसत आहे. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्लीचे पोलिस आयुक्त बी एस बस्सी यांनी दिली. तसेच यासंदर्भात सविस्तर चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई केली जाईल, असंही दिल्ली पोलीस आयुक्त बी एस बस्सी यांनी स्पष्ट केलं आहे.

‘इंडियाज डॉटर’मध्ये मुकेश सिंह याच्यासह ‘निर्भया’ गँगरेपमधील अन्य दोषी आणि वकिलांसोबत चर्चा करण्यात आली आहे. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष न्यायालयने मुकेशला फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर मुकेशने वरच्या कोर्टात अपील केलं आहे. मुकेश तिहार जेलमध्ये असताना त्याची मुलाखत घेण्याची परवानगी का देण्यात आली या संदर्भात गृह मंत्रालयानं अहवाल मागितला आहे.

दरम्यान, निर्भयावर बलात्कार करणार्‍या मुकेश सिंहच्या वक्तव्यांवरून देशभरामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच यावरून आज राज्यसभेतही गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हौदात उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज 15 मिनिटांसाठी थांबवावं लागलं. आरोपीची मुलाखत घेण्याची परवानगी देण्यात आल्याचा विरोधी पक्षातल्या नेत्यांनी निषेध केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close