एकहाती सत्तेसाठी कामाला लागा, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

March 4, 2015 5:07 PM0 commentsViews:

uddhav_in_ekvira04 मार्च : राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेत धुसफूस सुरूच आहे. एकहाती सत्तेसाठी कामाला लागा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पक्षवाढीचा अधिकार प्रत्येकाला असल्याचं त्यांनी म्हटलंय.

भूसंपादन विधेयकाच्या मुद्यावरून आज शिवसेना नेत्यांच्या बैठक पार पडलीय. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. या सरकारची श्वेतपत्रिका का काढू नये?, असा सवालच त्यांनी विचारला. तर परभणीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेना-भाजपमधल्या नाराजीवर सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजी नाही, सगळं व्यवस्थित सुरू आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

दरम्यान, भूसंपादन विधेयकावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये अजून एकवाक्यता झालेली नाही. नितीन गडकरी आणि उध्दव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतरही काही तोडगा निघू शकलेला नाही. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर टीका केली. एकीकडे सत्तेत राहायचं आणि दुसरीकडे सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलनं करायची हे बरोबर नाही असं दानवे म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देताना आम्ही केवळ विरोधासाठी विरोध करत नाही असं म्हटलंय. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close