सुशीलकुमार शिंदेंच्या काळात ‘निर्भया’ डॉक्युमेंटरीसाठी परवानगी

March 4, 2015 8:13 PM0 commentsViews:

sushilkumar shinde04 मार्च : निर्भयावर बलात्कार करणार्‍या मुकेश सिंहच्या मुलाखतीवरुन देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच धक्कादायक माहिती समोर आलीये. आयबीएन-नेटवर्कच्या हाती एक पत्र लागलंय. तत्कालीन गृहसचिवांनी त्यावेळच्या तुरुंग महासंचालक विमला मेहरांना लिहिलेलं हे पत्र आहे. यात त्यांनी लेस्ली उड्वीन यांना निर्भयाच्या डॉक्युमेंटरीसाठी परवानगी दिलीय. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे केंद्रीय गृहमंत्री होते.

निर्भयाच्या डॉक्युमेंटरीसाठी तुरुंगात असलेली आरोपींची मुलाखत घेण्यात गृहमंत्रालयाचा आक्षेप नसल्याचं त्यात म्हटलंय. विमला मेहरांनी यावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय. तर आपण परवानगी दिली नव्हती, असं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय.

दरम्यान, आज या प्रकरणावरून राज्यसभेतही प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज 15 मिनिटांसाठी थांबवावं लागलं. आरोपीची मुलाखत घेण्याची परवानगी देण्यात आल्याचा विरोधी पक्षातल्या नेत्यांनी निषेध केला. यावर याप्रकरणाची चौकशी करून दोषींना शिक्षा देण्यात येणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या डॉक्युमेंटरीच्या भारतात प्रक्षेपणावर बंदी घातलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close