सेक्शन टाईट

March 6, 2015 10:09 PM0 commentsViews:

shilesh tawateशैलेश तवटे, आयबीएन लोकमत

“क्या अण्णा क्या चल रहा है” असं एका गृहस्थाने बारच्या बाजूला असलेल्या टपरीवर अण्णाला विचारलं. तर त्याने “सेक्शन टाईट” असे उद्गार काढले. माझ्या मनात प्रश्न आला न् आलाच पटकन… माझ्या मित्राने विचारले, भावा ‘सेक्शन टाईट’ म्हणजे काय? मी हसलो आणि म्हणालो, अरे सध्या पोलिसांनी डान्स बारच्या बाजूला कडक पहारा ठेवलाय आणि कारवाईचा स्टंट सुरू केलाय, बाकी काही नाही. पण असो! त्या निमित्ताने सेक्शन टाईटचा शब्द नव्याने माझ्या कानावर आला.

पण गेले काही दिवस नवी मुंबई, पनवेल परिसरात असंच काहीसं वातावरण आहे. पण सेक्शन टाईट या शब्दाचा अर्थ काय? याचा मी शोध घ्यायला सुरुवात केली. मागील दहा दिवसांपासून मी त्याचा शोध घेत आहे. आर.आर. पाटील यांनी आपल्या काळात डान्स बार बंदीचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्रासाठी घेतला होता. पण त्यांच्या जाण्याची उणीव कोणी भरून काढेल असं काही वाटत नाही. ते जाण्याने पुन्हा टपरीवर आणि नाक्यावर बसणारा तरुण छमछमच्या ठेक्यावर नाचू लागला. दर दिवशी खिसा रिकामा करू लागला. पण व्हायचं तेच झालं. पुन्हा आई-बापाच्या डोळ्यातून अश्रू सांडू लागले. ही कुठली काल्पनिक कथा नसून एक धगधगतं वास्तव आहे. तीन साडेतीन महिन्यांपूर्वी पनवेलच्या एका गावात एका स्टोरीच्या निमित्ताने मी गेलो होतो. स्टोरी करून झाल्यावर गावातच एक 55 ते 60च्या वयातलं एक जोडपं मला भेटलं. खरं तर आई-वडिलांसमान… मी विचारलं, ‘काय झालं, बाबा…’ हे विचारताच त्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रूचा थेंब बाहेर आला. त्यांचा मुलगा याच डान्स बार ‘छमछम’च्या मार्गावर गेला होता. त्याला सावरण्याची ती वेळही निघून गेली होती. पैसा, जमीन-जुमला हे सर्व या नशेसाठी त्याने घालवलं होतं. तिथून निघाल्यावर याच गोष्टीचा मी विचार करतोय. हेच आहे सध्याचं वास्तव. कदाचित अशी अनेक कुटुंबं याच परिस्थितीत असावीत. मात्र याकडे आपल्यासारख्या प्रत्येकाने विचार करायला हवा.

535658dance_barगेल्या दहा दिवसांतील चित्र काही वेगळंच होतं. खाकी वर्दीतील जादू ही मला पाहायला मिळाली. याला शब्द वेगळा असेल. पण मला जादूच म्हणावंसं वाटतं. रुपेरी पडद्यावर जशा नायकाच्या भूमिका बदलतात तशाच काहीशा. पण त्या भूमिकेतला खरा आणि खोटा कुठला हे सांगणं थोडं कठीण आहे. प्रत्येकाचं मतदेखील वेगळं होतं. त्याच गमतीत कुणी मला सांगितलं, ‘भाऊ बस कर ना’ आता… हे एकून मीही थोडा स्तब्ध झालो… आमच्यावर दया करा, असा शब्द मला सुन्न करणारा होता. अगदी खालच्यापासून ते वरच्यापर्यंत हालचाल सुरू झाली. जशी काठी फिरवावी आणि सर्वच बंद व्हावं अगदी तसं क्षणार्धात पनवेल, नवी मुंबईतील छमछम बंद झालं. पण याचे मी धागेदोरे अजूनही शोधतोय, पण कुठेतरी ‘कहीं खुशी तर कहीं गम’ असं चित्र आहे.

समाजातील लोकांचे फोन वाजायला सुरू झाले आणि खूप छान हा शब्द कानी पडला. पण हे सगळं घडलं. ते एकाच गोष्टीने ते म्हणजे ‘सेक्शन टाईट’मुळे…आणि तेव्हाच या शब्दाचा अर्थ मला समजला. पण असो! या शब्दामुळे चांगलं घडलं हे महत्त्वाचं. आज की शाम तेरे नाम म्हणणार्‍यांनी दुसरे दरवाजे पकडू नये म्हणजे झालं. पण सेक्शन टाईट हा शब्द कायमस्वरूपी राहिला तर समाजाचं खूप भलं होईल एवढं मात्र नक्की. पण शेवटी माझ्या लिहिण्यानं कुणी दुखावलं असेल तर माफी असावी.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close