विधिमंडळ अधिवेशनात सरकारची कसोटी?

March 9, 2015 10:02 AM0 commentsViews:

Team fadnavis

09 मार्च : राज्यात आजपासून सुरू होणार्‍या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी भाजपची कसोटी लागणार आहे. फडणवीस सरकारला अनेक मुद्यांवरुन कोंडीत पकडण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. पण विरोधकांच्या हल्ल्याला तेवढ्याच आक्रमकपणे उत्तर देण्याचं फडणवीस सरकारने ठरवलं आहे. त्यामुळे आजपासून सुरू होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरूवात होईल. अवकाळी पावसाने हातातून निसटलेला हंगाम, मुस्लिम-धनगर आरक्षणाचा प्रश्न, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यामध्ये केंद्र सरकारची टाळाटाळ, गोवंशहत्या बंदी, तसचं कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येचा संथ तपास हे मुद्दे अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. तसचं पहिल्या दिवशी माजी गृहमंत्री आर.आर. पाटील आणि शिवसेनेचे बाळा सावंत यांच्या शोकप्रस्तावावर चर्चा होईल. तसंच कॉ. गोविंद पानसरे यांचा शोकप्रस्ताव मांडण्याची विरोधकांची मागणीही मान्य करण्यात आलीये. केळकर समितीच्या अहवालावर या अधिवेशनात चर्चा होणार आहे.

दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल (रविवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चहापान कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला विरोधकांनी बहिष्कार टाकला. यावरुन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलच धारेवर धरलं. गेली 15 वर्षं आघाडी सरकारच्या गैरकारभाराचे परिणाम आपल्या सरकारला भोगावं लागत असल्याची टीका त्यांनी केली. तसंच आघाडी सरकारच्या काळात झालेले घोटाळे बाहेर काढण्याची तंबी देत विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आक्रमक पवित्रा घेतला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close