मनसे @ 9 ; सुसाट ‘इंजिन’ घसरले कसे ?

March 9, 2015 2:45 PM0 commentsViews:

प्रणाली कापसे, मुंबई

09 मार्च : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज दहाव्या वर्षात पदार्पण करतेय. नऊ वर्षाच्या या कार्यकाळात मनसेनं, इतरांना न जमलेलं यश ही मिळवलं आणि अपयश सुद्धा. पण गेल्या लोकसभेपासून मनसेची यशाच्या याच शिखरावून जी घसरगुंडी सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. त्यामुळे मनसे या धक्क्यातून सावरेल मनसेला उतरती कळा लागेल यावर चर्चा सुरू आहे. मनसेच्या वाटचालीचा हा आढावा…mns @10

हो राजे…हो जी..जी…गेली नऊ वर्ष हा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात घुमतोय. कमी जास्त का असे ना, पण प्रत्येकाला या आवाजाची या…नावाची दखल घ्यावीच लागलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता दहाव्या वर्षात पदार्पण करणार आहे. अगदी स्थापनेच्या दिवसापासून म्हणजे 9 वर्षापूर्वीसुद्धा कुणी ही या व्यक्तीकडे दुर्लक्ष करू शकलं नव्हतं. ते नाव होत राज ठाकरे…आज या व्यक्तीची जादू तीच असली तरी त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाला मात्र सद्धा बरे दिवस आहे. असं म्हणता येत नाही. असं का व्हावं हे जाणून घेण्यासाठी जरा मागे जाव लागतं.

9 मार्च 2006 मनसेची स्थापना….त्यावेळी आधूनिकतेसह विकास हा अजेंडा राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. शिवसेनेची परंपरागता सोडून बाहेर पडलेल्या राज यांचा हा फंडा नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांना चांगलाचं भावला. 2007 च्या पहिल्याचं मुंबई महानगर पालिका निवडणुकीत मनसेनं 7 नगरसेवक निवडून आणले. आणि कार्यकर्त्यांचा उत्साहात आणखीनचं भर पडली. पण कार्यकर्त्यांचे हिरो राज अजून जनतेला अपील फारसे अपील करत नव्हते. दरम्यान, शिवसेना ही मराठीच्या मुद्यावरुन हिंदूत्वाकडे वळली होती. याच संधीचा फायदा घेत राज यांनी मराठीच्या मुद्याला हात घातला. आणि जादू झाली…पाहाता पाहाता राज अगदी बाळासाहेबांप्रमाणे मराठी माणसाच्या मनात जाऊन बसले. मुद्दा मराठी पाट्यांचा असो….की रेल्वेभरतीचा…राज ठाकरेंची रोखठोक वक्तव्य लोकांना पावलोपावली बाळासाहेबांची आठवण करुन देत होती. याच काळात मनसे आंदोलनाचा ‘खळ्ळ खट्याक’चा फार्म्युला बराच वादग्रस्तही ठरला. पण पुढे कालांतराने तीच मनसेची ओळख बनून गेली.

राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेचा त्यांना जितका फायदा झाला तीतकाचं तो काँग्रेसनही उठवला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज ठाकरेंच्या आंदोलनाला मुद्दाम हवा दिली. त्याचा परिणाम लगेच दिसून आला. 2010च्या लोकसभा निवडणुकीत मनसेला एकही खासदार निवडून आणता आला नसला तरी त्यांची विरोधी उमेदवाराला पाडण्याची ताकद मात्र सर्वांनी पाहिली. सेनेनं मुंबईतल्या सगळ्या जागा गमावल्या.

मनसेचा चढता आलेख
2010च्या विधानसभा निवडणूकीत मनसेचे13 आमदार निवडून आले
2012- मुंबई मनपा निवडणुकीत मनसे नगरसेवकांमध्ये चौपटीने वाढ
नाशिक मनपातही मनसेची सत्ता आली
पुणे मनपात मनसेची थेट दुसर्‍या क्रमांकावर धडक

इथपर्यंत सगळ ठिक होतं…पण गेल्या लोकसभा निवडणुकीत राज यांनी बाळासाहेबांचं सुप आणि वडे काढले आणि तिथंच ते मराठी जणांच्या मनातून उतरले…लोकसभेत उद्धव ठाकरेंची वाट लावण्यासाठी त्यांनी भाजपशी केलेला छुपा समझोताही मतदारांना आवडला नाही…आणि व्हायचं तेच झालं….लोकसभेत मनसेचं शब्दशः पानिपत झालं…पुढे विधानसभेतही हीच पराभवाची मालिका कायम सुरू राहिली…याच काळात राज त्यांचे अनेक शिलेदारही त्यांना सोडून गेले…मनसेच्या या पराभवाची कारणमिमांसा करायची झाल्यास…राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींसदर्भात घेतलेली धडसोडीची भूमिका…तसंच मनसेनं मध्यंतरी हाती घेतलेलं टोल आंदोलनही जनतेला अपील होऊ शकलं नाही…त्यांची बहुचर्चित आणि बहुप्रलंबित ब्ल्यू प्रिंट अनेकांच्या चेष्टेचा विषय बनून गेला होता…आणि या सगळ्यांचाच परिपाक म्हणून आज मनसेची ही अशी दयनिय अवस्था झालीये..

अर्थात एवढ्याशा पराभवाने खचून जातील ते राज ठाकरे कसले…भाषणबाजी फेल जाती म्हटल्यावर त्यांनी आपलं हक्काचा कुंचला बाहेर काढला…याच कुंचल्याद्वारे त्यांनी विरोधकांना फटकारे मारणं सुरू केलंय…मध्यंतरी तर राज ठाकरे स्वतःचं दैनिक काढणार असल्याच्याही चर्चा रंगल्या…अर्थात त्याचं पुढे काय झालं ते त्यांनाच ठाऊक…असो. एक मात्र, नक्की की मनसेच्या नवलाईचे नऊ दिवस केव्हाच संपून गेलेत…म्हणूनच दहाव्या वर्षात पदार्पण करताना मनसैनिकांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्यासाठी राज ठाकरे नेमका कोणता नवा कार्यक्रम हाती घेतात…हे पाहणं औस्त्सुक्याचं ठरणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close