अण्णांचं चलो दिल्ली, 30 मार्चपासून काढणार किसान संघर्ष यात्रा !

March 9, 2015 6:25 PM0 commentsViews:

anna kisan sanghrashya yatra09 मार्च : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भूसंपादन विधेयकाविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारला. वर्धा ते दिल्ली अशी 30 मार्चपासून पदयात्रा काढणार असल्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केलीये. ‘किसान संघर्ष यात्रा’ असं या पदयात्रेला नाव देण्यात आलं असून हरियाणा,पंजाब,बिहार,उत्तरप्रदेश येथील शेतकरी संघटनासुद्धा ह्या किसान संघर्ष यात्रामध्ये सहभागी होतील असंही अण्णांनी स्पष्ट केलं. ते वर्ध्यात बोलत होते.

भ्रष्टाचार विरोधी आंदोलनानंतर अण्णा हजारे पुन्हा आंदोलकाच्या भूमिकेत परतले आहे. अलीकडे दोन दिवस दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर दोन दिवस आंदोलनानंतर अण्णांनी आता आणखी आक्रमक भूमिका घेतलीये. अण्णांनी आज (सोमवारी) सेवाग्राममध्ये बापूंच्या आश्रमात देशभरातल्या पन्नास शेतकरी नेत्यांसोबत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीनंतर अण्णांनी पत्रकार परिषद घेऊन किसान संघर्ष यात्रेची घोषणा केली.

किसान संघर्ष यात्रा वर्ध्यातील सेवाग्राम मधून 30 मार्चला सुरू होईल आणि मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिल्लीत पोहचेल. वर्धा ते दिल्ली गावागावांतून ही संघर्ष यात्रा निघणार आहे. तसंच हरियाणा,पंजाब,बिहार,उत्तरप्रदेश येथील शेतकरीही संघटना सुद्धा या किसान संघर्ष यात्रामध्ये सहभागी होतील आणि दिल्लीकडे कूच करतील असंही अण्णांनी सांगितलं. वेळ पडल्याचं जेल भरो आंदोलन सुद्धा करू पण, यावर आमचा अजूनही निर्णय झालेला नाही, हे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने होईल. मागील जनआंदोलनाच्या प्रमाणेच आताही देशातील प्रत्येक खासदाराच्या घरासमोर भजन आंदोलन होईल असंही अण्णांनी जाहीर केलं.

या यात्रेचा कार्यक्रम ठरवण्यासाठी टीम निवडण्यात आलीये आणि लवकरच यात्रेची संपूर्ण माहिती प्रसिद्ध केली जाईल असंही अण्णांनी सांगितलं. जमीन अधिग्रहण विधेयक शेतकर्‍यांच्या हिताचे नाही आणि हे सरकार शेतकर्‍यांच्या विरोधात आहे. त्यामुळे या सरकारने शेतकर्‍यांच्या विरोधातलं हे बिल जर संसदेत पास केलं तर आम्ही या सरकारचा जोरदार विरोध करू असा इशाराही अण्णांनी दिला.

विशेष म्हणजे, यूपीए सरकारविरोधात अण्णांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनं केली होती. त्यांच्या तिन्ही आंदोलनाच्या वेळी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. अण्णांच्या आंदोलनामुळे यूपीए सरकारने सपेशल लोटांगण घेतले होते. अण्णांच्या दिल्लीत आंदोलनाच्या वेळी भाजपने अण्णांना पाठिंबा दिला होता. आता मोदी सरकारच्या विरोधात मैदानात उतरले आहे. त्यामुळे मोदी सरकार या पदयात्रेची कशी दखल घेतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close