शेतकर्‍यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक

March 10, 2015 3:05 PM0 commentsViews:

adhivashan protest

10 मार्च : शेतकर्‍यांच्या प्रश्नावर राज्यातील भाजप-शिवसेनेचं सरकार असंवेदनशील असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज मंगळवारी केली. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवसही वादळी ठरतोय. गारपीट आणि अवकाळी पावसाच्या प्रश्नावरून आज कामकाज सुरू होताच विरोधक आक्रमक झाले.

विधानसभेत स्थगन प्रस्तावाद्वारे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांवर ओढवलेल्या संकटावर तातडीने चर्चा घडवून आणण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र, सर्व विषय बाजूला ठेवून चर्चा सुरू करण्यात अध्यक्षांनी नकार दिल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी विधानसभेतून सभात्याग केला.

विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना विखे-पाटील म्हणाले, शेतकर्‍यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही स्थगन प्रस्ताव सादर केला होता. विधानसभेतील सर्व विषय बाजूला ठेवून याच विषयावर चर्चा घेण्याची आमची मागणी होती. मात्र, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील असल्याचे दिसत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या विषयावरून सत्ताधार्‍यांवर जोरदार टीका केली. दरम्यान, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील असून, विरोधक या प्रश्नावरून राजकारण करीत असल्याचा आरोप विधीमंडळ कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी केला. तर दुसरीकडे, सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अविश्वास प्रस्ताव आणण्यावर राष्ट्रवादी ठाम आहे.

  ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close