आता बोला,28 कोटींचा खर्च 1200 कोटींवर पण तरीही 35 वर्षांनंतर प्रकल्प अपूर्णच !

March 10, 2015 10:27 PM0 commentsViews:

parbhani 34पंकज क्षीरसागर, परभणी

10 मार्च : एखादा सिंचन प्रकल्प शासन स्तरावर हाती घेण्यात आला तर तो पूर्णत्वास जाण्यासाठी साधारण किती वर्ष लागावा…काय, तुमचा काय अंदाज आहे…? 10 वर्षे, 15 वर्षे, किंवा फार फारतर 20 वर्षे…. असंच ना….पण हे साफ चूक आहे…! परभणी जिल्ह्यातल्या लोअर दुधना प्रकल्पाला सुरू होऊन तब्बल 35 वर्ष लोटलीत. तरीही हा सिंचन प्रकल्प अजूनही अपूर्णावस्थेतच आहे. तुम्हीच बघा सिंचनात महाराष्ट्र कसा आणि किती रखडलाय.

परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातला बहुप्रलंबित लोअर दुधना सिंचन प्रकल्प..5 मे 1979 रोजी या प्रकल्पाला मान्यता मिळाली, त्यावेळी त्याची मूळ किंमत होती 28 कोटी…पण प्रकल्पाचं काम वेळेत सुरू न झाल्याने…त्याची किंमत आपोआप वाढली. म्हणूनच मग 92 साली या प्रकल्पासाठी 47 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. पण तरीही प्रकल्प पूर्ण काही झालाच नाही. म्हणूनच पुन्हा मुदतवाढ आणि पुन्हा वाढीव निधीची तरतूद असं करत या बहुप्रलंबित प्रकल्पाची फुगवण्यात आलेली किंमत आता थेट 1200 कोटींवर जाऊन पोहचलीय.पण आज 35 वर्षांनंतरही प्रकल्प काही पूर्ण झालाच नाही. आताही समजा हा किमान 2017 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा झाल्यास त्यासाठी अजूनही 700 कोटींची तरतूद करावी लागणार आहे.

लोअर दुधना प्रकल्पात परभणीचा सेलू, जालना जिल्ह्यातील परतूर आणि मंठा या 3 तालुक्यामधल्या 22 गावामधली तब्बल 5 हजार हेक्टर जमीन अधिगृहीत केली गेलीय. त्यावेळी या शेतकर्‍यांच्या जमिनींना कवडीमोल भावाने घेण्यात आल्या. त्यामुळे हे सगळेच प्रकल्पबाधित विस्थापित झालेत.

लोअर दुधना प्रकल्पातील महत्वाची पाणी आडवणारी 7 दरवाजांची भिंत बांधून पूर्ण झाली आहे. तर उजवा मुख्य कालवाही बांधून
झालाय. पण, कालव्यांतर्गतच्या चार्‍या तयार नसल्याने प्रत्यक्षात शेतीला पाणी काही मिळतच नाहीये. थोडक्यात कायतर पाण्यासाठी पाण्यासारखा खर्च करूनही लोअर दुधनाचं पाणी शेतीला काही मिळालंेच नाही.

रखडलेला महाराष्ट्र, लोअर दुधना प्रकल्प

5 मे 1979 रोजी मान्यता
मूळ किंमत 28 कोटी
पण प्रकल्पाचं काम रखडलं
1992-47 कोटींचा निधी मंजूर
तरीही प्रकल्प अपूर्णच
प्रकल्प रखडल्यानं खर्च 1200 कोटींवर
35 वर्षांनंतरही प्रकल्प अपूर्णच
2017 पर्यंत 700 कोटींची आवश्यकता

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close