दमानियांची ‘आप’ला रामराम, केजरीवालांवर घोडेबाजाराचं आरोपास्त्र

March 11, 2015 3:52 PM0 commentsViews:

damaniy on kejriwal311 मार्च : आम आदमी पार्टीमध्ये सुरू असलेल्या महाभारतात आता आणखी भर पडलीये. आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी ‘आप’ला जाहीर रामराम ठोकला आहे. मी, आप सोडलंय. काही तत्वांसाठी मी, पक्षात होते या मुर्खपणासाठी नाही अशी जळजळीत टीका अंजली दमानियांनी केलीये. दमानिया एवढ्यावरच थांबल्या नाहीतर तर केजरीवाल यांनी पक्षात घोडेबाजार केला असा आरोपही दमानियांनी केलाय.

दिल्लीच्या तख्तावर विराजमान होऊन काही दिवस होत नाही तेच आम आदमी पक्षात पुन्हा यादवी माजलीये. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण पक्षाच्या पराभवासाठी काम करत होते असा आरोप करत त्यांची पक्षातील राजकीय समितीतून हकालपट्टी करण्यात आलीये. यादव आणि भूषण यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे आपचे मुंबईचे नेते मयांक गांधी यांनी दोघांच्याही समर्थनात ब्लॉग लिहिलाय. हा वाद सुरू असतानाच अंजली दमानिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आणखी एक भूंकप घडवला.

दमानिया यांनी ट्विट करून थेट केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. मी, आप सोडलंय. पण काही तत्वांसाठी मी, पक्षात होते. या मुर्खपणासाठी नाही अशी सणसणीत टीका दमानियांनी केली. तसंच माझा अरविंद केजरीवाल यांना पूर्ण पाठिंबा होता, पण तो काही घोडेबाजार करण्यासाठी नाही असा आरोपही त्यांनी केला. विशेष म्हणजे, आपचे दिल्लीचे नेते राजेश गर्ग यांनी एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केलीये. या क्लिपमध्ये केजरीवाल आणि गर्ग यांचा संवाद असून मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आठ आमदार फोडण्याबाबत दोघांची बातचीत आहे.

केजरीवाल यांनी काँग्रेसचे आठ पैकी सहा आमदार फोडून नवा पक्ष स्थापन करावा आणि आपला पाठिंबा द्यावा अशी सुचना गर्ग यांना केलीये. गर्ग यांनी ही क्लिप प्रसिद्ध केल्यामुळे यावरच दमानियांनी संताप व्यक्त केलाय. पक्षात मुर्खपणासाठी आपण नाहीत अशी टीका करून त्यांनी ‘आप’ला रामराम ठोकलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close