ह्रदयद्रावक , 800 रुपयांसाठी ‘ती’ला बाळ गमवावे लागले!

March 13, 2015 2:27 PM0 commentsViews:

Thane hospital

13 मार्च :  वैद्यकीय चाचण्यांसाठी फक्त 800 रुपये नसल्यामुळे एका सात महिन्यांच्या गर्भवतीला आपलं बाळ गमवाव लागल्याची धक्कादायक घटना कळवा इथे घडली आहे.

गंगाराम घोडे हे 10 मार्चला जालन्याहून कल्याणमध्ये मजुरीच्या कामासाठी आले. त्या वेळी त्यांच्यासोबत त्यांची सात महिन्यांची गर्भवती पत्नी शारदा होती. प्रवासादरम्यान बॅग चोरीला गेल्यामुळे तिची शोधाशोध करत असतानाच शारदा यांच्या पोटात कळा येऊ लागल्या. त्यामुळे त्यांना लगेचंच कल्याणमधील रुक्मिणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तिथे पुरेशा सुविधा नसल्यामुळे त्यांना ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्यानंतर एका नर्सने वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांच्याकडे 800 रुपये मागितले. पण, बॅग चोरीला गेल्याने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगताच नर्सने त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. रुग्णालयातून बाहेर काढल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास हे दाम्पत्य मुंब्रा स्टेशनच्या दिशेने जात असताना रस्त्यावरच त्यांची प्रसूती झाली. तिथेच त्यांनी संपूर्ण रात्र घालविली. पण, सातव्या महिन्यातच डिलिव्हरी झाल्यानं नवजात बाळ अशक्त होते आणि त्यामुळे अवघ्या काही तासांतच त्याचा मृत्यू झाला.

रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळेच बाळ दगावल्याचा आरोप गंगाराम यांनी केला असून, या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत बालकाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घोडे दाम्पत्याने घेतली आहे. तर ही महिलाच हॉस्पीटलमधून पळून गेली असं बेजबाबदार स्पष्टीकरण खुद्द डॉक्टरांनी दिलं आहे. दरम्यान, या प्रकरणाची कळवा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close