श्रेया घोषालचा सुरेल प्रवास…!

March 13, 2015 3:12 PM0 commentsViews:

13 मार्च : बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल आज 31 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 12 मार्च 1984 रोजी पश्चिम बंगालमधील एका ब्राम्हण कुटुंबात झाला. मागील महिन्यात तिचा बालपणीचा मित्र शिलादित्यसोबत लग्नगाठीत अडकली. श्रेया घोषालने आपल्या सिंगिंग टॅलेंटच्या बळावर जगभरात नाव कमावेळ आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून तिने संगीताचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली हे फार कमी जणांना ठाऊक आहे. आईच तिची पहिली गुरु आहे.

श्रेयाचा जन्म बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातला. श्रेयाचे वडील पेशानं इंजिनीयर होते. त्यांची पोस्टिंग राजस्थानमध्ये झाली. आणि तिचं बालपण तिथेच गेलं. आणि तिथल्या सुर-तालामध्ये श्रेया रमली. वय होतं अवघं 4 वर्ष. त्याचवेळी ती हार्मोनियमवर सुरांचे वेगवेगळे प्रयोग करायची. सहाव्या वर्षी तिचं क्लासिकल ट्रेनिंग सुरू झालं. तिचं सिनेमातलं पहिलंच गाणं इतकं सुरेल होतं की ती तिच्या पुढच्या सुरेल प्रवासाची झलकच होती. स्टेजवर पहिल्यांदाच ती लतादीदींचं गाणं गाणार होती. आणि तिनं मुखडा म्हटल्यावर टाळ्यांचा जो काही कडकडाट झाला तो बराच काळ असाच वाजत राहिला. 1999 मध्ये श्रेयानं लिट्ल चॅम्प्समध्ये बाजी मारली. सारेगमच्या लहान मुलांच्या शोमध्ये संजय लीला भंसाळीच्या आईनं पहिल्यांदा श्रेयाचा आवाज ऐकला. या आवाजानं त्या अगदी मंत्रमुग्ध झाल्या. त्यांनी संजयला शोमध्ये बोलावलं आणि श्रेयाचं गाणं ऐकवलं. संजय लीला भंसाळीही तो आवाज ऐकून भारावूनच गेले. दोन हजार साली त्यांनी श्रेयाला देवदाससाठी साईन केलं. त्यावेळी श्रेयाचं वय होतं अवघं 16 वर्ष. आणि या वयात तिनं आवाज दिला होता ऐश्वर्या रायला. ऐश्वर्याची सर्व गाणी श्रेयानंच गायली. बॉलिवूडला एक दमदार, जादुई आवाज मिळाला. देवदाससाठी श्रेयाला आपला पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला… या दरम्यान संगीत श्रेत्रातले अनेक दिग्गज श्रेयाचं कौतुक करत होते आणि देवदासच्या यशानंतर तर श्रेया सगळ्या इंडस्ट्रीची लाडकी बनली. पण म्हणतात ना, प्रसिद्धी अशीच नाही मिळत. देवदास मिळण्याआधी श्रेया मुंबईत आली होती.

श्रेयाकडे सिनेमांची लाइनच लागली होती. प्रत्येकाला श्रेयाचा आवाज हवा होता. कमी वयात इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर अनेक कलाकारांच्या डोक्यात हवा जाते. पण श्रेयाचे पाय जमिनीवरच राहिले. आणि 2003 मध्ये ‘जिस्म’ मधील ‘जादू है नशा है…’ हे गाणं तिला मिळालं आणि श्रेयाचं करियर एकदम उंचीवर गेलं. 2005 मध्ये भट कँपचा आणखी एक सिनेमा श्रेयाला मिळाला. जहर सिनेमाचा टायटल ट्रॅक श्रेयाच्या आवाजात रिलीज झाला. श्रेया घराघरात पोहोचली. सिनेमाच्या निर्मात्यांच्या म्हणण्याप्रमाणे श्रेयाच्या आवाजामुळेच तो सिनेमा हिट झाला. यावेळी ‘परिणिता’चा संगीतकार शंतनू मोईत्रा वेगळ्या आवाजाच्या शोधात होते. श्रेयाचं गाणं त्यांनी ऐकलं  आणि परिणिता सिनेमाचं महत्त्वाचं ‘पियू बोले…’ हे गाणं त्यांनी श्रेयाला दिलं. गाणं सुपरडुपर हिट झालं. या गाण्यासाठी श्रेयाला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि मग ‘जब वुई मेट’च्या ‘ये इश्क हाये…’ या गाण्यानं तिला तिसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. आता श्रेयाचं करियर उंचीवर पोचलंय. अमेरिकेत ओहियो शहरात 26 जुलै हा श्रेया घोषाल डे असतो. श्रेयाचं यश भारतासाठी मानाचं ठरलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close