खोट्या रेल्वे भरतीचा पर्दाफाश, 48 मराठी तरुणांना लाखोंना लुटले

March 13, 2015 8:30 PM0 commentsViews:

rail bharti13 मार्च :रेल्वेमंत्रिपदी पहिल्यांदाच सुरेश प्रभू म्हणून मराठी व्यक्ती विराजमान झालीय. मात्र रेल्वेमंत्र्यांच्या महाराष्ट्रातील तब्बल 48 मराठी तरुणांची रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आलीये. नोकरीसाठी अरविंद शर्मा नावाच्या एका ठग एजंटनं 48 तरूणांकडून प्रत्येकी 7 लाख रुपये लुटले. हा घोटाळा 50 कोटीहून अधिक असल्याची शक्यता आहे. एवढंच नाहीतर या तरुणांनी सहा महिने बेसिक पगारावर नोकरीही केली. परंतु नेमणुकीच्या वेळी ही भरतीच खोटी असल्याची बाब लक्षात आली.

एखाद्या सिनेमात घडावा असा प्रसंग महाराष्ट्रातील 48 तरुणांसोबत घडलाय. रेल्वेत नोकरी मिळाली, ट्रेनिंग झालं, बेसिक पगारही मिळाला, सहा महिने नोकरीही केली पण सहा महिन्यांनंतर जेव्हा नेमणुकीची वेळ आली तेव्हा ही भरतीच खोटी असल्याचं समोर आलं. ठग अधिकार्‍यांनी पळ काढला आणि हातात राहिली फक्त खोट्या नोकरीच्या नियुक्तीचे कागदपत्र…. अहमदनगर, सोलापूर आणि धुळे येथील 48 तरुणांकडून प्रत्येक 7 लाख रुपये घेऊन कोलकाता रेल्वे ट्रेनिंग स्कूलमध्ये ट्रेनिंग झालं. एवढंच नाहीतर टीसीपासून असिस्टंट स्टेशन मॅनेजर पदापर्यंत भरतीही दाखवण्यात आली. या सर्व तरुणांना अरविंद शर्मा नावाच्या एका एजंटनं रेल्वेत नोकरी मिळवून देतो असं सांगत या तरुणांना दिल्लीत बोलावलं.

त्यांचं कोलकातामधल्या रेल्वेच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये अधिकृत ट्रेनिंगही झालं. त्यानंतर त्यांचं पाटणाजवळ दानापूरमध्ये पोस्टिंग झालं. पगार मिळाला. या तरुणांना 4 महिने बेसिक पगारावर नोकरीवर ठेवण्यात आलं. 6 महिन्यांनंतर कायमस्वरूपी नेमणूक करतो असं सांगण्यात आलं. पण त्यानंतर रेल्वे अधिकार्‍यांनी तुमचं जॉईनिंगच झालेलं नाही, असं सांगितलं आणि या तरुणांना त्यांची फसवणूक झाल्याचं कळलं.

बहुतेक तरुणांची घरची परिस्थिती बेताच आहे. यापैकी सुनील जुंधारे या फसवलं गेलेल्या तरुणाचे आई-वडिलांचा व्यवसाय शेती आहे. आपली शेती विकून त्यांनी आपल्या मुलाच्या नोकरीसाठी पैसा उभा केला. पण, आपल्या मुलाची अशी फसवणूक झाल्याचं कळल्यानंतर संपूर्ण कुटुंबच हताश झालंय. या प्रकरणी शिवसेना,मनसे आणि काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close