भूसंपादनाला विरोधच पण महायुतीतून बाहेर पडणार नाही – शेट्टी

March 15, 2015 8:09 PM1 commentViews:

15 मार्च : सत्ताधार्‍यांच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणारच अशी आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली असली तरी महायुतीतून बाहेर पडण्याविषयी स्वाभिमानी संघटनेने मवाळ धोरण स्वीकारले आहे. सत्ताधार्‍यांच्या चुकीच्या निर्णयांविरोधात आंदोलन करू पण महायुतीतून बाहेर पडणार असं स्पष्टीकरण संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विस्तारित कार्यकारिणीची पुण्यात दोन दिवसीय बैठक झाली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीत राहणार की नाही यावर निर्णय होण्याची आशा होती. महायुतीमध्ये राहून काय मिळाले असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित करत होते.

सत्ताधार्‍यांनी शेतकर्‍यांच्या बाजूचे निर्णय घेतले नाही अशी टीकाही ‘स्वाभिमानी’ कार्यकर्त्यांकडून होत होती. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आम्ही स्वतःहून महायुतीतून बाहेर पडणार नाही, पण त्यांना आम्हाला काढून टाकायचे असेल तर त्यांनी काढावं व तसं जाहीरही करावे असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

भूसंपादन कायदा आणि सेझविरोधात 23 तारखेला शहीद दिनी खेड ते पुणे असा मोर्चा काढू अशी घोषणाही राजू शेट्टी यांनी केली. पंतप्रधान परदेशात जाऊन तिथल्या नागरिकांसाठी घर बांधतायत पण इथे शेतकर्‍यांचं घरं उजाड होतंय असे टीकास्त्रही शेट्टी यांनी सोडले. सरकारने तातडीने राष्ट्रीय आपत्ती निवारण आयोगाची स्थापना करावी आणि अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकर्‍यांना एक महिन्यांच्या आत मदत द्यावी अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. एकीकडे विरोध अन् दुसरी महायुतीत राहून स्वाभिमानी शेतकरी संघटना एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवून काय साधू इच्छिते असा सवालही आता उपस्थित होत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Amol

    ‘Swabhimani’ ha shabd palin kela yanni..Shetkaryanche kaivari ahat mag shetkaryanna deshodhadila lavnara kayda pass kela tari he ajun sarkar sobat rahaych ase mhantayat..kiti lalachi vhyave …!!!

close