रत्नागिरीत दरड कोसळून 8 जणांचा बळी

October 1, 2009 10:05 AM0 commentsViews: 3

1 ऑक्टेबर गेले दोन दिवस रत्नागिरीत सुरू असलेल्या मुसळधार पावसानं 8 जणांचा बळी घेतला आहे. राजापूरमधल्या वडद हसोळ गावात एका घरावर दरड कोसळून ही दुर्घटना घडली. त्यात मनोहर मादये यांच्या कुटुंबातल्या 8 जणांनी जीव गमावला आहे. तर गुरंही ढिगार्‍याखाली गाडली गेलीत. ढिगार्‍याखाली आत्तापर्यंत 6 मृतदेह सापडले आहेत. जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून असून पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. पावस-राजापूर मार्गावर हर्डी इथं पूल कोसळला आहे. त्यामुळे रत्नागिरी-पावस-राजापूर मार्गावरील 10 छोट्या वाड्यांचा संपर्क तुटलाय. गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात 269 मिमि तर राजापूर तालुक्यात 280 मिमि पाऊस झाला. राजापूर शहरात पाणी घुसलं होतं. तर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. मालवण तालुक्यात 265 तर देवगड मध्ये 246 मिमि पाऊस झाला. वेंगुर्ले आणि कुडाळमध्ये प्रत्येकी 180 मिमि पाऊस झाला. देवगड तालुक्यात 17 घरं आणि पाच गोठ्यांची पडझड झाली आहे . या पावसामुळे दोन्ही जिल्ह्यात भातशेतीचंही बरच नुकसान झालं आहे. बुधवारी राजापूर तालुक्यातल्या मिठगवाणे गावात शाळेच्या वर्गखोलीवर संरक्षक भिंत कोसळून 2 विद्यार्थीनींचा मृत्यू झाला होता.

close