हेरगिरी घरी जाऊन केली जात नाही – जेटली

March 16, 2015 1:28 PM0 commentsViews:

jaithley and rahul gandhi

16 मार्च : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या चौकशीचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले. राहुल यांच्या चौकशीतून मोदी सरकार विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका काँग्रेसचे सदस्य गुलाब नबी आझाद यांनी आज राज्यसभेत केली. या विषयावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावर उत्तर देताना, पाळत ठेवायची असती तर अधिकारी ऑफिसमध्ये जातील का, असा उलट सवाल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली विचारला आहे.

दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालयात जावून राहुल गांधी यांच्याविषयी चौकशी केली होती. या चौकशीबद्दल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. काँग्रेससह संयुक्त जनता दल आणि समाजवादी पक्षानंही आज संसदेत हा विषय उपस्थित करून मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यावर आज जेटली यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. दुसरीकडे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी आज सकाळी संसदेत येऊन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू आणि गृहसचिवांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत माहिती दिली आणि पोलिसांची भूमिका समजावून सांगितली. ‘काँग्रेसच्या ऑफिसमध्ये जाऊन राहुल गांधीची चौकशी करणं, हा नियमित प्रक्रियेचा भाग होता’, असं पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितलं.

‘चौकशी केली म्हणजे हेरगिरी केली असं होत नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांची चौकशी झाली आहे. त्यामुळे या मुद्द्याचे राजकारण करू नये. दिल्ली पोलिसांकडून 1999 पासून राजकीय व्यक्तींची चौकशी करण्यात येते. तसेच यावेळीही नियमित चौकशी करण्यात आली. दर दोन वर्षांनी माझीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येते, असं स्पष्टीकरण अरुण जेटली यांनी दिलं आहे. या उत्तरानं काँग्रेस खासदारांचं समाधान झालं नाही यामुळे नेत्यांचं खासगी आयुष्य धोक्यात आले आहे असं म्हणत, काँग्रेस खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close