सरकारच्या ‘आरे’ला कारे करणार, राज ठाकरेंनी डागली तोफ

March 16, 2015 5:30 PM0 commentsViews:

raj_nashik43516 मार्च : आघाडी सरकारने जे केलं तेच भाजप सरकार करतंय. मुळात आरे कॉलनीच्या जमिनीवर राजकर्त्यांचा डोळा असून आम्ही ‘आरे’ला कारे का नाही म्हणायचं असा खडा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला असून मेट्रो-3 प्रकल्पाला कडाडून विरोध केलाय. या प्रकल्पाच्या माध्यमातून ‘आरे’ची आणि मुंबईची विल्हेवाट लावण्याचा घाट भाजप सरकारने रचलाय असा घणाघाती आरोपही राज यांनी केला.

फडणवीस सरकारच्या मुंबई विकास आराखडा आणि प्रस्तावित मेट्रो -3 प्रकल्पावरून वादंग निर्माण झाला असून शिवसेनेपाठोपाठ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या वादात उडी घेतलीये. राज ठाकरे यांनी आरे कॉलनीची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन फडणवीस सरकारवर तोफ डागली. ज्या रिकाम्या जागा आहेत त्या कुणासाठी आणि कशाला विकतायत ?, या जागेवर शैक्षणिक संस्था उभा करण्याचा सरकाराचा दावा आहे. पण या शैक्षणिक संस्था यांच्याचच, बिल्डर लॉबी ही यांचीच, यांनाच या सगळ्या गोष्टी विकायच्या आहे. सरकारच्या प्रत्येक गोष्टीमागे कुणाचा तरी काही तरी हेतू आहे. भाजप सरकारला निवडणुकीच्या वेळी आर्थिक पाठिंबा ज्यांनी दिला होता त्याची वसुली आता या प्रकल्पांतून केली जात आहे असा गंभीर आरोप राज यांनी केलाय.

तसंच आरे कॉलनीच्या जमिनी विकण्यासाठी काढलीये आणि यावर बिल्डरांचा डोळा आहे. आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली त्यावरून विरोधही झाला पण, आता तीच गोष्ट भाजप सरकार पुढे रेटत आहे. मग, आघाडी सरकारने काय चुकीचं केलं होतं. मग कशासाठी आघाडी सरकार पाडा आमच्या हाती सत्ता द्या असं आवाहन कशाला करायचं ? आघाडी सरकारने जाहीर केलेले प्रकल्प जर पुढे न्यायचे असेल तर तुम्ही सत्तेवर कशाला आला ?, असा संतप्त सवालही राज यांनी फडणवीस सरकारला विचारला. आरे प्रकल्प राबवणार्‍या पी.के.दास आणि इतर मंडळींशी मी बोललो. त्यानंतर कळलं यासाठी तीन प्रस्ताव होते. पहिला होता हाजी अली रेसकोर्सच्या खाली, दुसरा कलिना कॅम्पस आणि तिसरा हा आरे कॉलनी होता. पहिले दोन्ही प्रस्ताव बाजूला सारून थेट तिसर्‍या आरेच्या प्रकल्पात हात घालण्यात आला. मग यांच्या आरेला आम्ही कारे का नाही म्हणायचं?, असा सवाल उपस्थिती करत मी प्रगतीच्या विरोधात नाही असंही राज ठाकरे यांनी बजावून सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close