हंटर : नव्या विचारांची ‘अॅडल्ट कॉमेडी’

March 21, 2015 10:09 PM0 commentsViews:

अमोल परचुरे, समीक्षक

2015 या वर्षात बॉलीवूड वयात आलंय असं कदाचित आपण वर्षाच्या शेवटी म्हणणार आहोत…पहिल्या तीन महिन्यात बॉलिवूडने दिलेल्या सिनेमांवरुनच हे लक्षात येतंय, नवं टॅलेंट, नवा विचार, नवी चित्रभाषा ही आता चांगलीच स्थिरावलीये, सूज्ञ प्रेक्षकांकडूनही या सिनेमांना मिळणारा प्रसिाद नक्कीच उत्साहवर्धक आहे. शमिताभ, बदलापूर, एनएच 10 या सिनेमांनी हे सिद्ध केलंय. प्रेक्षकांचं नुसतं एंटरटेनमेंट करणं एवढंच सिनेमा या माध्यमाचं काम असू शकत नाही, अशाच विचारांचा नवोदित दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी हंटर नावाचा सिनेमा घेऊन आलाय. प्रोमोवरुन सेक्स कॉमेडी आहे असं वाटू शकेल, पण हंटर म्हणजे आहे ऍडल्ट कॉमेडी…शरीरसुखासाठी मुली किंवा बायका कशा पटवायच्या असलं काहीतरी सिनेमात असेल असंही प्रोमो बघून वाटू शकेल, पण सिनेमा अशा वासुगिरीच्या खूप पलीकडचा आहे. फक्त पुरुषांच्या नजरेतून नाही तर स्त्रीच्या मानसिकतेचा विचारसुद्धा यामध्ये करण्यात आलाय. सगळं काही करुन नामानिराळे राहण्याची पुरुषांची वृत्ती आणि आपण शिकार तर होणार नाही ना या भितीखाली वावरत असलेली स्त्री ही भारतीय समाजव्यवस्था नव्या जमान्यातसुध्दा तशीच आहे का हे तपासण्याचा प्रयत्नच या सिनेमात करण्यात आलाय असंही सिनेमाचं वर्णन करता येईल..

काय आहे स्टोरी?

Hunterr-45645लेखक दिग्दर्शकाने विषयासाठी निवडलंय मुंबई, पुण्यातलं मराठी कॉस्मोपॉलिटन वातावरण…नायक आहे मंदार पोंक्षे, जो ऐंशीच्या दशकात जन्म झालेल्या तरुणाईच प्रतिनिधीत्व करतो…जेव्हा टीव्ही, इंटरनेट, मोबाईल नव्हते तेव्हा मनातलं कुतूहल शमवण्यासाठी काय काय केलं जातं ते आपण बालक-पालक सारख्या सिनेमात पाहिलेलं आहे, पण बालक-पालक मधली मुलं वेळीच सावरली जातात, पण मंदार पोंक्षेचं तसं नाही, कॉलेजपासून त्याची वासुगिरी वाढतच जाते. पुण्यात शिक्षणासाठी एकटा राहत असल्यामुळे त्याला स्वातंत्र्यही मिळतं. पुढे नोकरी लागते, इतर मित्रांची लग्न होतात, पण हा लग्नाच्या विरोधात असतो.. लग्न केलं तर आयुष्यातली मजा निघून जाईल असं त्याला वाटत असतं. शेवटी घरच्यांच्या दबावामुळे तो ऍरेंज मॅरेजसाठी तयार होतो. तृप्ती नावाच्या मुलीला भेटतो, त्याला ती आवडतेही, पण आपला भूतकाळ कसा लपवून ठेवायचा ही चिंताही त्याला असते. दरम्यानच्या काळात समवयस्क नातेवाईकांच्या आयुष्यात घडणार्‍या घटनांचाही खोलवर परिणाम मंदार पोंक्षेवर होत असतो. अशा बर्‍याच लेयरमधून जाणारी हंटरची गोष्ट काहीशी लांबल्यासारखी वाटत राहते, पण म्हणून सिनेमा फसलाय असं होत नाही.

नवीन काय

hunterr 555यातली प्रत्येक स्त्री व्यक्तिरेखा ही नायकाला काही न काही शिकवून जाते, आणि या प्रत्येक वेळेला स्त्रीच्या मनात काय आहे किंवा स्त्रियांना नेमकं काय हवं असतं, कम्फर्ट लेव्हल ही त्यांच्यासाठी किती महत्त्वाची असते अशा अनेक गोष्टीही सिनेमात येत राहतात. लग्न झालेलं असो किंवा नसो, स्त्रियांना चालू किंवा बाहेरख्याली अशी लेबलं सहज लावली जातात, पण वासुगिरी करणार्‍या पुरुषी मानसिकतेला स्त्रीचं मन कळल्यावर काय गोची होऊ शकते इथपर्यंतचा विचारही सिनेमात आहे. असं बरंच काही आहे सिनेमात, जे मनोरंजनही करतं आणि डोक्याला चालनाही देतं. विशेष म्हणजे, मराठी कॉस्मोपॉलिटन वातावरणामुळे यात मराठी कलाकारांची निवड करण्यात आलीय. यामध्ये नीना कुलकर्णी, ज्योती सुभाष, वैभव तत्ववादी या सर्व कलाकारांनी उत्तम काम केलंय. सई ताम्हणकरने आपल्या भूमिकेत जान ओतली असून पूर्ण न्याय दिलाय. जाता जाता जर तुम्हाला एखादी ब्रिलियंट कॉमेडी पाहायची असेल तर नक्की हा सिनेमा पाहावा…

रेटिंग 100 पैकी 75
 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close