‘कहाँ तुम चले गये…?’, अमेठीत राहुल गांधींसाठी पोस्टर

March 25, 2015 4:05 PM0 commentsViews:

rahul gandhi lost

25 मार्च : गेल्या एक महिन्यांपासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी नेमके आहेत कुठे, याचा शोध घेण्यासाठी अमेठीतील जनता पुढे सरसावली आहे. ‘खासदार बेपत्ता’ अशी पोस्टर्स अमेठीत ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. राहुल गांधी हरवल्याच्या या नव्या पोस्टरमुळे राहुल गांधी आणि काँग्रेसपुढे आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुडवून चिंतनासाठी सुटीवर निघून गेल्याने राहुल गांधींवर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे रितसर अर्ज करून त्यांनी सुटी मंजूर करून घेतली खरी मात्र, संसदेच्या अधिवेशनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला तरही राहुल गांधी काही परतले नाही. काँग्रेसकडूनही याबाबतची कोणतीही माहित देण्यात येत नसल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यातच सुटी घेऊन राहुल गांधी नेमके गेले तरी कुठे, असा सवाल सगळ्यानांचं पडल्यामुळे आता अमेठीतील नागरीकांनीच आपल्या खासदाराला शोधण्याची मोहीम हाती घेतलेय.

‘खासदार बेपत्ता’ अशी पोस्टर्स त्यांनी ठिकठिकाणी लावली आहेत. या पोस्टर्सवर राहुल गांधी यांच्या फोटोखाली अमेठीतील नागरिक कोणकोणत्या समस्यांना सामोरे जातीये अशा 10 महत्त्वाच्या प्रश्नांची यादीच देण्यात आली आहे. त्याचं बरोबर या पोस्टरवर ‘जाने वो कौनसा देश, जहा तुम चले गए, चिट्ठी ना कोई संदेश, कहाँ तुम चले गये’ अशाही ओळी छापण्यात आली आहे. एवढंच नाही तर आपल्या खासदार महोदयांना शोधून देणार्‍याला इनामही जाहीर करण्यात आलंय.

राहुल गांधी यांच्या सुट्टीसंदर्भात कोणालाच कल्पना नसल्याने सत्ताधारी भाजपकडून होणारी टीका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सहन करावी लागत आहे. त्यात आता या पोस्टर्समुळे काँग्रेसपुढे आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दरम्यान, या पोस्टरसंदर्भात माहिती मिळाल्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर ते हटविण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागण्याची वेळ आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close