महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेनेची पुन्हा युती

March 25, 2015 7:00 PM0 commentsViews:

Yuti  new

25 मार्च : नवी मुंबई आणि औरंगाबादमधील आगामी महापालिका निवडणुका एकत्रपणे लढण्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी तत्त्वतः होकार दर्शविला. मात्र, युतीतील सर्वात महत्त्वाचे जागावाटप अद्याप निश्चित झालेले नसून, त्यावर दोन्ही पक्षांमध्ये लवकरच चर्चा करण्यात येणार आहे.

भाजपशी युती व्हावी, अशी आमची इच्छा असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (मंगळवारी) सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज (बुधवारी) ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेनेसोबत युती व्हावी, अशी आमचीही इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 22 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 111 तर औरंगाबाद पालिकेच्या 113 जागांसाठी ही निवडणूक होते आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने शिवसेनेशी असलेली युती तोडल्यानंतर हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. मात्र, राज्यातील मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्याने निवडणुकीनंतर सत्तेमध्ये भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा एकत्र आले होते.

राज्यात स्वबळावर सत्तास्थापनेसाठी वाटचाल केल्यावर त्यात अपयश आल्याने महापालिका निवडणुकीतही सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेला भाजपची साथ हवी आहे. राज्यात भाजपची ताकद वाढल्याने शिवसेनेला स्वबळावर सत्ता मिळविणे अवघड असल्याने भाजपची मदत घेतल्याशिवाय पर्याय नसल्याची जाणीव शिवसेनेला झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये बुधवारी चर्चा झाली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close